भोसरी चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्याच्या हेतूने उड्डाण पूल बांधण्यात आला. १२ कोटींपासून सुरू झालेल्या पुलाच्या खर्चाचा आकडा १०० कोटींच्या पुढे गेला. मात्र, वाहतूक कोंडीत काडीचाही फरक पडला नाही. उलट, पुलाखालील भागात प्रचंड अतिक्रमणे झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून असलेल्या चौकातील गोंधळाच्या परिस्थितीची उशिरा का होईना महापौर मोहिनी लांडे व आमदार विलास लांडे यांनी दखल घेतली व शुक्रवारी दोन तासाचा पाहणी दौरा केला. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
उड्डाण पूल झाला तेव्हापासूनच त्याखाली मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण आहे. अनेक वाहने उभ्या-आडव्या पध्दतीने लावली जातात. ‘चायनीज’च्या गाडय़ांवर दारू विकली जात होती. पथारीवाले रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नव्हती. वाहनांसाठी पुरेशी जागा नसल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. नगरसेवक अजित गव्हाणे यांनी पालिका सभेत ही परिस्थिती मांडली, त्यानंतर थोडीफार सुधारणा झाली होती. मात्र, पुन्हा ‘जैसे थे’ झाले. शुक्रवारी महापौर व आमदारांनी संपूर्ण फौजफाटय़ासह पाहणी दौरा केला. यावेळी नगरसेवक अजित गव्हाणे, संजय वाबळे, वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता वसंत साळवी, ज्ञानदेव जुंधारे, प्रभाग अधिकारी दत्तात्रय फुंदे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी, आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे, सतीश गव्हाणे, सहायक पोलीस आयुक्त उमराव बांगर, पोलीस निरीक्षक प्रकाश गरड, सूर्यकांत केकाणे, सहायक वाहतूक नियंत्रक बापू गायकवाड, विलास जगताप, डी. एन. गायकवाड आदी उपस्थित होते.
अतिक्रमणाविषयी सातत्याने तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्याची कानउघडणी केली. पुलाखाली ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्यात येणार असून आळंदी रस्ता, दिघी रस्ता व चांदणी चौकात सर्कल करण्यात येणार आहे. पुलाखाली जाळी लावण्यात येणार असून लॉन विकसित करण्यात येणार आहे. चारचाकी व दुचाकींसाठी वाहनतळ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आळंदी रस्त्यावर सिग्नल उभारण्यात येणार असून आळंदी रस्त्यावर ‘पी १, पी २’ पध्दतीने पार्किंग होणार आहे. पीएमपीचा बसथांबा नाटय़गृहाशेजारी हलवण्यात येणार आहे.
भोसरीतील १०० कोटीच्या उड्डाणपुलाचा उपयोग काय? – सतत वाहतूक कोंडी; महापौर-आमदारांकडून दखल
भोसरी चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्याच्या हेतूने उड्डाण पूल बांधण्यात आला. मात्र, वाहतूक कोंडीत काडीचाही फरक पडला नाही. उलट, पुलाखालील भागात प्रचंड अतिक्रमणे झाली.
First published on: 31-08-2013 at 02:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overbridge of 100 cr cant stopped traffic jam in bhosari chawk