पिंपरी पालिकेचे २०१६-१७ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक आयुक्त राजीव जाधव मंगळवारी (१६ फेब्रुवारी) स्थायी समितीला सादर करणार आहेत. यासाठी सभापती अतुल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मांडण्यात येणाऱ्या या अंदाजपत्रकाविषयी शहरवासीयांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक करवाढ नसलेले, नवीन प्रकल्पांची घोषणा न करता पूर्वीची कामे पूर्ण करण्यावर भर देणारे होते. १८५ कोटी शिलकीचे आणि ३६१६ कोटींच्या अंदाजपत्रकात रस्त्यांचे जाळे, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि पारदर्शक कारभाराची ग्वाही देतानाच २४ तास पाणीपुरवठय़ाचा पुनरूच्चार होता. यंदाच्या अंदाजपत्रकात काय आहे, याची उत्सुकता सर्वामध्ये दिसून येते. आगामी वर्षांत फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर नाराजी नको म्हणून स्थायी समितीने करवाढ नाकारली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोणती करवाढ सुचविण्यात येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader