पिंपरी महापालिकेच्या वतीने सांगवी-पिंपळे गुरव येथे काटे पूरम चौकात उभारण्यात येत असलेल्या प्रशस्त व खर्चिक नाटय़गृहाचे काम आता अखेरच्या टप्प्यात आहे. या नाटय़गृहास दिवंगत अभिनेते निळूभाऊ फुले यांचे नाव देण्यात आले आहे. पिंपरी पालिकेच्या क्षेत्रीय सभेत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
चित्रपटसृष्टीतील निळूभाऊंचे योगदान लक्षात घेऊन तसेच पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप कोणत्याही प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आले नसल्याने नाटय़गृहास त्यांचे नाव दिल्याचे स्थानिक नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सभेत नामकरणाचा विषय मांडण्यात आला असता, सर्वानुमते तो मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे हे नाटय़गृह ‘नटसम्राट निळू फुले रंगमंदिर’ या नावाने ओळखले जाणार आहे.
‘काटे पूरम’ चौकातील एक एकर जागेत जवळपास साडेसहाशे आसनक्षमता असलेल्या या नाटय़गृहासाठी २२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. जानेवारी २०१३ मध्ये या कामाचे आदेश दिले होते. एकेक करत सर्व अडचणी दूर झाल्यानंतर २०१५ मध्ये हे काम मार्गी लागले. नाटय़गृहाच्या रचनेत विश्रांतीगृह, पाहुण्यांचा कक्ष, अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुसज्ज वाहनतळ, कॅफेटेरिया आदींची व्यवस्था आहे. छोटय़ा कार्यक्रमांसाठी २०० आसनक्षमतेचे स्वतंत्र सभागृह राहणार आहे. डिसेंबपर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यानंतर, समारंभपूर्वक नामकरण होणार आहे

Story img Loader