पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी रस्ते जूनपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगत हे रस्ते पार्किंगमुक्त व हॉकर्समुक्त असतील, असे आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आयुक्त जाधव यांनी शहरातील प्रमुख रस्ते व बीआरटी मार्गाचा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा पूर्ण केला, त्यावेळी आलेले अनुभव त्यांनी पत्रकारांना सांगितले. शहरातील रस्ते चांगले आहेत. मात्र, काही उणिवाही आहेत. रस्त्यांवर अपेक्षित सफाई होत नाही. पदपथ तसेच दुभाजकांची दुरवस्था आहे. रस्त्यांच्या कडेला राडारोडा, दगड, मुरूम पडलेले दिसून येतात. प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण आहे. ते रस्ते स्वच्छ व नीटनीटके करण्याचा प्रयत्न राहील. क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर आणखी सुधारणा अपेक्षित आहेत. बीआरटी रस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण होता कामा नये. बीआरटी रस्ता पार्किंगमुक्त व हॉकर्समुक्त करणार आहे. बीआरटीमुळे रस्ते छोटे झाले असले व काही प्रमाणात वाहतुकीचे प्रश्न निर्माण होत असले तरी त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाई नाही
दापोडीतील पाणीटंचाई संपली आहे, तेथे कृत्रिम पाणीटंचाई असल्याची स्थानिक नगरसेवक राजेंद्र काटे यांची तक्रार होती. मात्र, अशाप्रकारे कृत्रिमटंचाई करता येत नाही. काटे यांचे निरसन झाले आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. चिंचवडगावात पाणीटंचाई असल्याचे अनंत कोऱ्हाळे यांनी सांगितले होते, तेथेही आपण लक्ष घातल्याचे आयुक्तांनी सांगितले.
‘बीआरटी’ रस्ते पार्किंगमुक्त व हॉकर्समुक्त करणार – आयुक्त
पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी रस्ते जूनपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगत हे रस्ते पार्किंगमुक्त व हॉकर्समुक्त असतील.
First published on: 07-04-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc commissioner brt parking