मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पिंपरीतील स्वीकृत सदस्यपदी संघटनात्मक काम करणाऱ्या माउली थोरात, बाबू नायर आणि मोरेश्वर शेडगे या तीन कार्यकर्त्यांची निवड केली, तेव्हा कोणी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. चार दिवसांनंतर मात्र ठरवून ‘उद्योग’ करण्यात आला. चुकीच्या उमेदवारांची शिफारस केल्याचा कांगावा करत राज्यसभेचे खासदार अमर साबळे व राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांचे पुतळे पक्ष कार्यालयासमोरच जाळण्यात आले आणि त्यांच्या छायाचित्रांना काळे फासण्यात आले. ‘करते करविते’ नामानिराळे राहिले. करायला गेले उद्रेक, मात्र बार फुसका ठरला. यानिमित्ताने पक्षातील गटबाजी, हेवेदावे व नव्या-जुन्यांचा संघर्ष पुन्हा चव्हाटय़ावर आला.
पुण्यातील स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून राडा झाला, तशीच परिस्थिती पिंपरीतही होणार होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही अन्य शिफारशींचा विचार न करता, संघटन सरचिटणीस माउली थोरात, सरचिटणीस बाबू नायर आणि युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष मोरेश्वर शेडगे या संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यामुळे उद्रेक झाला नाही. ज्यांची वर्णी लागली नाही, असे काही जण ‘अस्वस्थ’ होते. पुण्यासारखे काहीतरी झालेच पाहिजे, असा चंग त्यांनी बांधला आणि कृत्रिम उद्रेक करण्याची रणनीती आखण्यात आली. मोरेश्वर शेडगे यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला, त्याचे पक्षवर्तुळात कौतुकच झाले. शेडगे यांच्याविषयी प्रेम असो-नसो. मुख्यमंत्र्यांनीच ते नाव निश्चित केल्याने इतरांचा नाईलाज झाला. त्यामुळे शेडगे वगळता इतर दोन नावे पुढे करून असंतोष व्यक्त करण्याची खेळी करण्यात आली. त्यासाठी शनिवारी (१३ मे) पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ, विद्यमान नगरसेवक नामदेव ढाके, शीतल िशदे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, राजेश पिल्ले, ज्येष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी, अनुप मोरे आदी बैठकीस उपस्थित होते. बैठकीत आवेशपूर्ण भाषणे झाली. पक्षातील नेत्यांचा शेलक्या शब्दांत उद्धार करण्यात आला. तोपर्यंत कार्यालयाबाहेर खासदार अमर साबळे व अॅड. सचिन पटवर्धन यांचे पुतळे आणण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला, अशी आवई उठायला नको आणि भलतेच संकट अंगावर यायला नको म्हणून पुतळय़ांवर पटवर्धन व साबळे यांची नावे ठळकपणे टाकण्यात आली. साबळे-पटवर्धन या दोघांच्या मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी, असा गोंधळ होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना भाजप कार्यकर्त्यांनी कळवली. पत्रकार घटनास्थळी आल्यानंतर कॅमेरे व छायाचित्रकारांच्या साक्षीने ठरवून केलेले आंदोलन उरकण्यात आले. पुण्यात झालेला उद्रेक उत्स्फूर्त होता. मात्र, िपपरीत बनाव होता, तोही व्यवस्थित झाला नाही. जेमतेम तीन-चार कार्यकर्त्यांनी हा उद्योग केला. जबाबदारी घ्यायला कोणीच पुढे आले नाही. त्यांचा वापर करून घेण्यात आला. निवडणुकीपूर्वी, पक्षांतर्गत वादातून आमदार महेश लांडगे यांच्या मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई झाली नाही आणि आताही पुतळे जाळणाऱ्यांवर काही कारवाई होईल, असे वाटत नाही. कदाचित हाच शिस्तप्रिय भाजप असेल. िपपरी भाजपमध्ये पक्षांतर्गत पातळीवर बरीच धुसफुस आणि गटबाजीचे राजकारण आहे, हे यानिमित्ताने नव्याने समोर आले.
माउली थोरात हे खासदार साबळे यांचे तर बाबू नायर हे अॅड. पटवर्धन यांचे कट्टर समर्थक आहेत. स्वीकृत करण्यासारखे त्यांचे काहीच योगदान नाही, नेत्यांची चमचेगिरी करण्याशिवाय त्यांनी काहीच केले नाही, असे त्यांच्यावर आक्षेप आहेत. पैसे घेऊन पक्षविरोधी काम केल्याचा ठपका थोरातांवर ठेवण्यात आला आहे, तो त्यांना मान्य नाही. तर, नायर दोनच वर्षांपूर्वी पक्षात आले. काँग्रेसमध्येही चमचेगिरी करून त्यांनी स्वीकृत नगरसेवकपद मिळवले होते, तोच कित्ता त्यांनी भाजपमध्ये येऊन गिरवला, असा त्यांच्याविषयी तक्रारीचा सूर आहे. मात्र, नायर यांना ते मान्य नाही. पक्षश्रेष्ठींनी परप्रांतीय कार्यकर्ता, ज्येष्ठता व आपल्या संघटनात्मक कामाची नोंद घेत निवड केल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. थोरात, नायर व शेडगे यांची वर्णी लागल्याने अनेकांचा हिरमोड झाला. काहींची राजकीय तर काहींची आर्थिक गणिते बिघडली. त्यामुळेच त्यांनी हा कांगावा आणि जाळपोळीचे नाटय़ घडवून आणले. थोरात किंवा नायर हे प्यादे आहेत. खरा विरोध त्यांच्या राजकीय ‘गॉडफादर’ला आहे. अमर साबळे यांना शहरातील स्वयंघोषित गडकरी गटाचा पहिल्यापासून तीव्र विरोध होता. सन २००९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी साबळे िपपरी-चिंचवडला आले. गोपीनाथ मुंडे यांनी िपपरी विधानसभेची उमेदवारी डोळय़ांसमोर ठेवून त्यांची शहरात ‘एन्ट्री’ घडवून आणली, तेव्हाच अनेकांचे पित्त उसळले होते. लादलेला उमेदवार नको म्हणून भाजपच्या अनेक प्रस्थापित पदाधिकाऱ्यांनी तेव्हा साबळे यांच्या विरोधात काम केले होते. आताचे शहर भाजपचे अनेक नेतेगण आघाडीवर होते. स्वत:ला मुंडे समर्थक म्हणून घेणाऱ्यांनीही साबळे यांच्या पराभवासाठी हातभार लावला होता. आता हीच मंडळी नव्याने साबळे यांच्याविरोधात एकत्रित आली असून त्यांना पक्षांतर्गत बळही मिळाले आहे. पटवर्धन हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते. पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी त्यांना नाकारण्यात आली म्हणून ते भाजपमध्ये आले. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी दोन वेळा ‘पदवीधर’मधून माघार घेतली. त्याची परतफेड म्हणून पाटलांनी ‘लाल दिव्या’ची बक्षिसी देऊ केली होती. सत्ता आल्यानंतर पहिली लॉटरी पटवर्धन यांचीच लागली होती. तेव्हाही अनेकांची खदखद बाहेर आली होती. साबळे व पटवर्धन यांचे ‘वरती’ चांगले वजन आहे. ‘खाली’ त्यांचे फारसे काही चालत नाही. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी सत्ता आणून दिली, मात्र वरच्या राजकारणात त्यांना कितपत स्थान आहे, याविषयी शंका घेण्यास जागा आहे. लांडगे यांनी महापौरपदासाठी नितीन काळजे यांचे नाव लावून धरले होते, तेव्हा पक्षश्रेष्ठींनी नामदेव ढाके यांच्यासाठी पूर्णपणे ‘फील्िंडग’ लावली होती. हा अनुभव लक्षात घेऊनच स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सीमा सावळे यांना कोणत्याही प्रकारची स्पर्धा होणार नाही आणि आपल्या इच्छेविरुद्ध दुसरा उमेदवार दिला जाणार नाही, याची खबरदारी जगतापांनी घेतली होती. स्वीकृत नगरसेवक ठरवताना जगताप व लांडगे यांच्या शिफारशी विचारात घेण्यात आल्या नाहीत. त्यावरून ते दोघेही संतापले आहेत. थोरात यांनी पक्षाच्या विरोधात काम केले होते, त्यामुळे त्यांची स्वीकृतची निवड चुकीची आहे, यावर जगताप ठाम आहेत. १९ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृतच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे, तोपर्यंत भाजपमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघणार आहे.