पिंपरीच्या महापौरपदासाठी १२ सप्टेंबरला निवडणूक होत असून महापौरपदासाठी दावेदार असलेल्या तीन सदस्यांपैकी कोणाची निवड करायची, याचा निर्णय सर्वाशी चर्चा करूनच घेऊ. सव्वा वर्षांचे दोन महापौर की एकालाच अडीच वर्षे, असे काहीही ठरवले नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी स्पष्ट केले.
पिंपरीचे महापौरपद अनुसूचित जमातींसाठी आहे. महापालिकेत या प्रवर्गातील रामदास बोकड, शकुंतला धराडे आणि आशा सुपे हे तीनच सदस्य दावेदार असून तिघेही राष्ट्रवादीचे आहेत. यापैकी सुपे आमदार विलास लांडे समर्थक आहेत. तर, बोकड व धराडे माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाचे आहेत. यापैकी कोणाला संधी मिळेल, अशी उत्कंठा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात, अजितदादा म्हणाले, महापौर व उपमहापौरपदासाठी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आदिवासी समाजाला प्रथमच संधी मिळणार आहे. दोन महिला व एक पुरुष असे तीन जण दावेदार आहेत. दोन जणांना प्रत्येकी सव्वा वर्षे की एकालाच अडीच वर्षे, असे काही ठरवले नाही. सर्वाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ.
दरम्यान, पक्षनेते मंगला कदम यांनी इच्छुकांचे अर्ज मागवले असून प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. १२ सप्टेंबरला निवडणूक होणार असल्याने सहा सप्टेंबरला उमेदवारीअर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Story img Loader