दोन अपत्ये झाल्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यांच्या संख्येत पिंपरी-चिंचवडने पुण्याला मागे टाकून मोठी आघाडी घेतली आहे. कुटुंब नियोजनाच्या दर वर्षी ठरवल्या जाणाऱ्या उद्दिष्टापैकी दोन अपत्यांनंतर ही शस्त्रक्रिया करून घेण्यात पुणे पालिकेने ४७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याच वेळी पिंपरी- चिंचवडने मात्र १४३ टक्के उद्दिष्टपूर्तीची कामगिरी बजावली आहे.
एकूण कुटुंब नियोजनाची गुणवत्ता मोजण्यासाठी दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यांची संख्या हे एक प्रमुख निदर्शक मानले जाते. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीतील या निदर्शकाची आकडेवारी पाहता पुण्याच्या ग्रामीण भागाची कामगिरीही पुणे पालिकेपेक्षा चांगली असल्याचे दिसते. शहराच्या ग्रामीण भागासाठी ठरवल्या गेलेल्या उद्दिष्टापैकी ७० टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.
बाळंतपणासाठी खासगी दवाखान्यांमध्ये दाखल झालेल्या मातांना आणि त्यांच्या कुटुंबाला दोन अपत्यांनंतरच्या कुटुंब नियोजनाची गरज समाजावून सांगण्याची अधिक गरज असल्याचे मत पुणे पालिकेच्या आरोग्य उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘पुण्यात दरवर्षी ४८ ते ५० हजार बाळांचा जन्म होतो. या बाळंतपणांपैकी ८ ते १० हजार बाळंतपणे शासकीय रुग्णालयात होतात. शासकीय दवाखान्यांना कुटुंब नियोजनाविषयीचे उद्दिष्ट ठरवून दिलेले असल्यामुळे या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी प्रयत्न होतात. काही खासगी दवाखान्यांकडूनही तसे प्रयत्न होतात, मात्र खासगी दवाखान्यांकडून दोन अपत्यांवरील कुटुंब नियोजनासाठी अधिक जनजागृती होण्याची अपेक्षा आहे.’’
कुटुंब नियोजन क्षेत्रातील पिंपरी- चिंचवडच्या यशाचे श्रेय क्षेत्रीय कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असून पालिकेच्या दवाखान्यांचे सक्षमीकरण करण्याच्या सुरू झालेल्या प्रक्रियेचाही सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे पिंपरी- चिंचवडचे आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.    
 
एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत पुणे महापालिका, पुणे ग्रामीण आणि पिंपरी- चिंचवडची दोन अपत्यांनंतरच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची आरोग्य उपसंचालक कार्यालयाने पुरवलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे-
                    वार्षिक उद्दिष्ट        उद्दिष्ट साध्य        टक्केवारी
पुणे महापालिका        १२,२९०            ५,७२८            ४७ टक्के
पुणे जिल्हा            २६,५८३            १८,४९५             ७० टक्के
पिंपरी-चिंचवड महापालिका    ६,९२५        ९,८८५        १४३ टक्के

Story img Loader