राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने पिंपरी बालेकिल्ल्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले. या माध्यमातून राष्ट्रवादीने आगामी महापालिका निवडणुकांसाठी जोरदार वातावरणनिर्मिती केली.
पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. पक्षाचे ९० हून अधिक नगरसेवक आहेत. पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ‘साहेबांचा’ वाढदिवस भव्य स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन शहर राष्ट्रवादीने केले. शहरभरात ७५ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले, त्याचा प्रारंभ शनिवारी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते डेअरी फार्म येथे करण्यात आला. खराळवाडीत पक्ष कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. भोसरीत अनाथ विद्यार्थ्यांना, तर निगडीत अपंग विद्यार्थ्यांना धान्यवाटप करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कारांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे सौदागर येथे फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अशाप्रकारच्या विविध कार्यक्रमांमुळे शहरातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते.
निमित्त ‘साहेबांच्या’ वाढदिवसाचे, तयारी पालिका निवडणुकीची
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने आगामी महापालिका निवडणुकांसाठी जोरदार वातावरणनिर्मिती केली.
Written by दिवाकर भावे

First published on: 13-12-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc ncp celebrated sharad pawar birthday anniversary