पिंपरी-चिंचवड पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांचे अभ्यासाच्या नावाखाली विदेश दौऱ्यांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. आता पाणीपुरवठय़ाचे अधिकारी व स्थायी समिती सदस्य इस्त्रायलच्या अभ्यास दौऱ्यावर निघाले आहेत.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद जाधव, उपअभियंता सुनील भागवानी, कनिष्ठ अभियंता प्रसाद देशमुख यांच्या इस्त्रायल येथील अभ्यास कार्यक्रमासाठी जाण्याच्या प्रस्तावासह १२ लाख ६४ हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या दौऱ्यात स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप व अन्य दोन स्थायी सदस्य सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या १७ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ‘एसएससीआय’ द्वारा पाणीपुरवठाविषयक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. इस्त्रायल येथील जेरुसलेम व तेल अवीव या शहरांत ते जाणार आहेत. पाणीपुरवठा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, व्यवस्थापन, मीटिरग, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. दौऱ्यासाठी प्रत्येकी सव्वादोन लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. एकूण साडेबारा लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या अभ्यास दौऱ्याचा फायदा पिंपरी पालिकेला होईल, असा युक्तिवाद पालिका प्रशासनाने केला आहे.