भाजपकडे सत्ता आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प

पिंपरी महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक बुधवारी (१२ एप्रिल) सादर करण्यात येणार आहे. पालिकेची सूत्रे प्रथमच भाजपच्या हातात गेल्यानंतर सादर होणारे हे पहिले अंदाजपत्रक असल्याने राजकीय वर्तुळात तसेच शहरवासीयांमध्ये त्याबाबत उत्सुकता आहे.

महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे बुधवारी सकाळी अकरा वाजता आगामी आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणार आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत सादर होणाऱ्या अंदाजपत्रकामध्ये काय असेल, याविषयी सर्वानाच उत्सुकता आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हे अंदाजपत्रक तयार केले असले तरी त्यावर पूर्णपणे भाजपची छाप राहणार आहे. आयुक्त स्वत:ची बदली करवून घेण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी ते सतत मुंबई वाऱ्या करत आहेत. त्यामुळे अंदाजपत्रकाचे सोपस्कार सत्ताधारी नेत्यांनीच हाती घेतले असल्याचे दिसून येते.

मागील १५ वर्षे पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सत्तांतर झाले. शहराचा कायापालट झाल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले आणि भाजपच्या हातात सूत्रे दिली. भाजपने सत्तासंतुलन साधताना समाविष्ट गावातील चऱ्होली भागातून नितीन काळजे यांना महापौरपदाची संधी दिली. काळजे हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. पक्षाचे जुने कार्यकर्ते एकनाथ पवार यांना गटनेतेपद देतानाच युवा कार्यकर्ते अनुप मोरे यांच्या मातोश्रींची उपमहापौरपदावर वर्णी लावण्यात आली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या सीमा सावळे यांना संधी देण्यात आली.

सत्ता मिळाल्याचा आनंद आणि सत्कारांमधून मोकळे झाल्यानंतर भाजपची खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. बुधवारी अंदाजपत्रक सादर होणार आहे. प्रथमच अंदाजपत्रकाला सामोरे जाणाऱ्या भाजपला काहीतरी भरीव दिल्यासारखे किमान दाखवायचे आहे. त्यासाठी पहिल्याच अंदाजपत्रकात काय असेल, याची सर्वानाच उत्सुकता आहे.