पिंपरी पालिकेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. वर्गणी गोळा करून जमा झालेल्या पैशातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना मदत केली. मात्र, प्रसिद्धीपासून ते जाणीवपूर्वक चार हात दूरच राहिले आहेत.
पिंपरी पालिका मुख्यालयातील विकास काळजे, अमोल खांडेकर, दीपक शिवरकर, एस. डी. जाधव, प्रवीण बोरसे, घनश्याम कदम, किरण तळपे, महेंद्र मलबरे, काळुराम आसवले, संजय लोखंडे, रवींद्र जाधव, ज्ञानदेव भांडवलकर आदी सुरक्षा कर्मचारी आपापसात वर्गणी गोळा करतात आणि त्यातून ते परिसरातील सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना मदत करतात. गेल्या दोन वर्षांपासून प्रसिद्धीपासून चार हात दूर राहून ते हा उपक्रम राबवत आहेत. प्रत्येकी १०० रुपये गोळा केल्यानंतर त्यांच्याकडे ३६ हजार रुपये जमा झाले होते. तेव्हा ही रक्कम गरजूंसाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची त्यांनी माहिती मिळवली. मावळातील पाचाणे गावात शांताई येवले शिक्षण प्रसारक मंडळ ही अनाथ मुलींचे वसतिगृह चालवणारी संस्था आहे. त्यांना पाच हजाराची मदत केली. त्यानंतर शेल पिंपळगाव येथील अनाथाश्रमातील मुलांसाठी त्यांनी ४० उबदार चादरी व खाऊचे वाटप केले. वडमुखवाडी येथील रेणुका शिशुगृहात एक दिवसापासून सहा वर्षांपर्यंतची लहान मुले असतात. त्यांच्यासाठी १८ हजार रुपये खर्च करून चौरस आहार नेऊन दिला. दिवाळीतही त्यांनी गरजूंना दिवाळीचे पदार्थ उपलब्ध करून दिले. बऱ्याच दिवसांपासून हे सुरक्षारक्षक अशी सामाजिक बांधिलकी जपत आहेत. मात्र, त्याची फारशी वाच्यता ते करत नाहीत. आम्ही हे प्रसिद्धीसाठी करत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader