बेकायदा फलकांचा सुळसुळाट * महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात अवघे २००० फलक
पिंपरी-चिंचवडमध्ये जिकडे-तिकडे जाहिरात फलकांचा सुळसुळाट दिसत असला तरी, महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात जेमतेम दोन हजार फलक आहेत. वर्षांकाठी ५५ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकत असताना सद्य:स्थितीत अवघे आठ कोटी पालिकेच्या पदरात पडत आहेत. अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जाहिरात कंपन्यांच्या अभद्र युतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेला दरवर्षी कोटय़वधी रुपयांना चुना लावण्याचे काम बिनबोभाट सुरू आहे. उशिरा जाग आल्यानंतर पालिकेने सव्र्हेक्षण हाती घेतले असून उत्पन्नवाढीसाठी विविध पर्यायांचा विचार सुरू केला आहे.
पिंपरी पालिकेच्या परवाना विभागाकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. त्याकडे कोणी कधी गांभीर्याने पाहिले नाही. ठरावीक जाहिरात कंपन्यांची मक्तेदारी असून ते ठेकेदारच हा विभाग चालवतात, असे स्पष्टपणे दिसून येते. सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे नेते ठेकेदाराचे ‘लाभार्थी’ असल्याने कशाही प्रकारे मनमानी सुरू आहे. शहरभरात पालिकेच्या जागेत २७, एमआयडीसीच्या जागेत १७ फलक आहेत. तर, इतर खासगी फलक असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. चार वर्षांपूर्वी हीच संख्या ५६० इतकीच होती, असेही सांगितले जाते. शहरातील प्रत्यक्षात असणारी फलकांची संख्या खूपच मोठी आहे. मात्र, ते फलक खासगी जागेत आणि बेकायदा असल्याचे सांगून पालिका अधिकारी हात वर करून मोकळे होतात. मात्र, एकाची परवानगी घेऊन जागेवर दहा फलक लावण्याचे उद्योग आजपर्यंत बिनबोभाट चालत आले आहेत. कारवाईचे नाटक अधून-मधून सुरू असते. स्थापत्य विभागाकडून सहकार्य मिळत नाही, वेळेवर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नाही, राजकीय नेत्यांचे दूरध्वनी येतात आणि कारवाई अर्ध्यावर सोडावी लागते, अशा अडचणी सांगत स्वत:ची अकार्यक्षमता या विभागाकडून वेळोवेळी लपवण्यात आली आहे. या सर्व प्रकारात पालिकेचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होते.
पालिकेचे उत्पन्न वाढावे, यासाठी विचार सुरू झाल्यानंतर परवाना विभागानेही अनेक मार्गाने तसा प्रयत्न चालवला आहे. या संदर्भात नुकतेच एक सव्र्हेक्षण करण्यात आले. त्यानुसार, महापालिकेच्या विविध जागा, चौक, रस्ते या ठिकाणी नवी जाहिरात ठिकाणे शोधण्यात आली. प्राथमिक पाहणीनंतर अशी ४०६ स्थळे निश्चित करण्यात आली आहेत व त्या ठिकाणी ५३८ फलक बसवता येणार आहेत. मात्र, स्थापत्य, भूमीजिंदगी, नगररचना या विभागांमध्ये समन्वय नसल्याने हा विषय अद्याप मार्गस्थ झालेला नाही. दिशादर्शक कमानी यापूर्वी महामार्गावरच लावण्यात येत होत्या व त्यावर जाहिराती लावण्यात येत असल्याने पालिकेला उत्पन्न मिळवता येत होते. त्याच पद्धतीच्या आणखी ९९ जागा शोधण्यात आल्या आहेत. त्यातून भरघोस उत्पन्न मिळण्याचा विश्वास या विभागाला वाटतो आहे. विद्युत विभागाच्या वतीने लावण्यात येणारे पोल कोणीही व कसेही वापरत होते. त्याची मोजणी करण्यात आल्यानंतर शहरात ९२६६ पोल असल्याचे निदर्शनास आले. लवकरच या सर्वाच्या निविदा काढण्यात येणार असून त्यातून भरघोस उत्पन्न मिळू शकणार आहे.
फलकांमुळे उत्पन्न
वर्ष वार्षिक उत्पन्न
२०१४-१५ ५ कोटी ९४ लाख
२०१५-१६ ६ कोटी ६२ लाख
२०१६-१७ ८कोटी १० लाख