पिंपरी-चिंचवड शहरातील विशेषत: पिंपरी बाजारपेठेतील वाहतुकीच्या कोंडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर, येत्या २२ जूनपासून शहरात महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी, पथारीवाले, रिक्षावाले, शाळा तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत बैठकीत देण्यात आले.
पिंपरी पालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड, नगरसेवक डब्बू आसवानी, सुनीता वाघेरे, अरूण टाक, माजी नगरसेवक हरेश आसवानी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित होते. याबाबतची माहिती आवाड यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले,‘वाहतूक कोंडीसंदर्भातील कारणे व उपायांची सविस्तर चर्चा बैठकीत झाली. त्यानंतर, २२ जूनपासून संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी व्यापाऱ्यांना पूर्वकल्पना दिली जाणार आहे. रिक्षाचालकांनी स्टँडचा वापर करावा, इतरत्र कुठेही वाहने उभी करू नयेत, अशी सूचना देण्यात येणार आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. पिंपरी बाजारपेठेत वाहतुकीची समस्या जटिल आहे. सकाळी नऊ ते एक आणि दुपारी चार ते नऊ या कालावधीत प्रकर्षांने ही समस्या जाणवते. नागरिकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव आहे. वाहतूक पोलीस नसल्यास नियम पाळले जात नाहीत, याकडे आवाड यांनी लक्ष वेधले. बारणे म्हणाले, केवळ कागदी घोडे न नाचवता वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.

Story img Loader