पीएमपीसह पिंपरी प्राधिकरण अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे असलेला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी याबाबतचे आदेश दिले. पिंपरी महापालिकेचे आयुक्त म्हणून मुंढे येणार, अशी चर्चा बऱ्याच काळापासून होती. तथापि, त्यांनी पिंपरीत येण्यास स्वारस्य दाखवले नव्हते. तथापि, प्राधिकरण अध्यक्षपदाच्या माध्यमातून मुंढे यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये चंचूप्रवेश झाला आहे. मुंढे यांची विशिष्ट कार्यपद्धती पाहता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. प्राधिकरणातील प्रलंबित विषयांची प्रदीर्घ यादी पाहता, मुंढे यांची जोरदार ‘इनिंग’ पाहायला मिळणार आहे.
पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्षपद जवळपास दहा वर्षांपासून रिक्त आहे. काँग्रेसची सत्ता असताना काळेवाडीतील माजी नगरसेवक बाबासाहेब तापकीर यांनी प्राधिकरणाचे अध्यक्षपद भूषवले. ते लोकप्रतिनिधी असणारे शेवटचे अध्यक्ष ठरले. त्यानंतर, विभागीय आयुक्तांकडे प्राधिकरणाचे अध्यक्षपद दिले जात होते. गेल्या दहा वर्षांत दिलीप बंड, विकास देशमुख, प्रभाकर देशमुख, एस. चोक्किलगम या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनीच हे पद भूषवले. सध्या चंद्रकांत दळवी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती. मात्र, त्यांच्याकडील पदभार काढून घेत तुकाराम मुंढे यांच्याकडे तो सोपवण्यात आला आहे. मुंढे हे पद स्वीकारण्यास तयार नव्हते, नाइलाजाने त्यांनी ते स्वीकारले, असे सांगण्यात येते. पुढील आदेश येईपर्यंत मुंढे यांनी हा अतिरिक्त पदभार स्वीकारावा, असे याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पिंपरी प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाकड, भोसरी आदी बराचसा भाग येतो. येथील प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्राधिकरणाशी संबंधित तक्रारी वर्षांनुवर्षे तशाच आहेत. दहा वर्षांपासून प्राधिकरणाची लोकनियुक्त समिती नाही. आतापर्यंत प्राधिकरणाला लाभलेले अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा संथ कारभार नागरिकांनी अनुभवला आहे. मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, विविध गृहप्रकल्प, रस्ते विकास, पेठांचे नियोजन, वर्तुळाकार मार्ग, अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे आदी विविध विषय प्रलंबित आहेत. यापैकी प्रस्तावित िरगरोडचा विषय तापलेल्या
अवस्थेत आहे. मुंढे आल्यानंतर ‘पाडापाडी’ सुरू होईल का, अशी धास्ती नागरिकांमध्ये आहे. तर, मुंढे आपल्याला किंमत तरी देतील का, अशी चिंता लोकप्रतिनिधींना वाटते आहे. मुंढे आल्यानंतर स्थानिक समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.