पिंपरी पालिकेचे आयुक्त म्हणून रूजू झालेल्या राजीव जाधव यांनी संभाजीनगर येथे प्रथमच जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली आणि प्रस्तावित ‘मॉडेल वॉर्ड’ संकल्पनेविषयी काही अपेक्षा व्यक्त करतानाच सूचनाही केल्या. ‘मॉडेल वॉर्ड’साठी नागरिकांच्या सूचना मागवून घ्याव्यात व त्यासाठी प्रभागस्तरावर ‘जनसुनवाई’सारखे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
चिंचवड संभाजीनगरच्या पालिकेच्या व्याख्यानमालेत जाधव उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेवक प्रसाद शेट्टी उपस्थित होते. मंगला कदम व नारायण बहिरवाडे प्रतिनिधित्व करत असलेल्या शाहूनगर-संभाजीनगर प्रभागाची पहिल्या ‘मॉडेल वॉर्ड’साठी निवड करण्यात आली, त्याचा संदर्भ देत आयुक्त म्हणाले, शहरातील प्रत्येक प्रभाग ‘मॉडेल वॉर्ड’ करायचा आहे. त्याचे नेतृत्व हा प्रभाग करणार आहे. या संकल्पनेनुसार संबंधित प्रभागात प्रत्येकी पाच कोटी खर्च करण्यात येतील. वास्तविक इतके पैसे पुरणार नाहीत. तरीही यातून कोणत्या चांगल्या सुविधा पुरवता येतील, याचा विचार सुरू आहे. प्रभाग विकास योजना (वॉर्ड डेव्हलपमेंट प्लान) असे या उपक्रमाचे नामकरण असून त्यात लोकसहभाग अपेक्षित आहे. देशात, परदेशात फिरणाऱ्या नागरिकांनी आपल्याला आवडलेली कल्पना शेअर करण्यास हरकत नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी जनसुनवाई उपक्रम राबवावा, नागरिकांच्या सूचना घ्याव्यात व त्याचा समावेश असणारा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. मॉडेल वॉर्ड संकल्पनेनुसार एकापाठोपाठ एक वॉर्ड चांगले होतील आणि पर्यायाने शहर चांगले होईल. ज्या सुविधा मॉडेल वॉर्डात होतील, त्या अन्य प्रभागातही करण्यात येतील. शहराच्या भल्यासाठी आलो आहे आणि भलेच करणार आहे, अशी टिप्पणी आयुक्तांनी केली. मंगला कदम यांनी प्रास्ताविक केले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले.
‘मॉडेल वॉर्ड’ साठी लोकसहभाग अपेक्षित; लोकप्रतिनिधींनी ‘जनसुनवाई’ उपक्रम राबवावा -पिंपरी आयुक्त
‘मॉडेल वॉर्ड’साठी नागरिकांच्या सूचना मागवून घ्याव्यात व त्यासाठी प्रभागस्तरावर ‘जनसुनवाई’सारखे उपक्रम राबवावेत, असे आवाहन पिंपरी पालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी केले.
First published on: 20-02-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peoples contribution is necessary for model ward rajeev jadhav