फुलराणीचा ६१ वा वाढदिवस उत्साहात
पेशवे उद्यान आणि फुलराणी हे पुण्याचे वैभव आहे. त्याचे जतन करणे गरजेचे असून त्यासाठी योग्य ते सर्व प्रयत्न महापालिकेकडून केले जातील, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी दिले. केवळ पेशवे उद्यानच नाही तर शहरातील सर्वच उद्याने अद्ययावत आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न महापालिका करेल. त्यासाठी पुण्यात कार्यरत असणाऱ्या पर्यावरणप्रेमी संस्था आणि व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
फुलराणीच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेशवे उद्यानात आयोजित केलेल्या कार्यक्रमात महापौर टिळक बोलत होत्या. फुलराणीची सैर करण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांसह महापौरांनी केक कापून आणि हवेत फुगे सोडून फुलराणीचा वाढदिवस साजरा केला. नगरसेवक धीरज घाटे, स्मिता वस्ते, सरस्वती शेडगे, माधुरी सहस्रबुद्धे, फुलराणीचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते करण्यात आले होते त्या सुगंधा शिरवळकर, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, संवाद संस्थेचे सुनील महाजन आणि निकिता मोघे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महापौरांनीही फुलराणीच्या आठवणी जागवल्या. लहानपणी केलेल्या फुलराणीच्या सफरीचे अनुभव कथन केले आणि फुलराणीची सैरही केली. फुलराणी सजवण्यात आली होती. तसेच फुलराणीची प्रतिकृती असलेला केक तयार करण्यात आला होता.
टिळक म्हणाल्या, ‘‘पेशवे उद्यान आणि फुलराणीला लहान असल्यापासून अनुभवत आलो आहोत. हे उद्यान पुण्याच्या वैभवात भर टाकणारे आहे. हा वारसा जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येतील.
फुलराणीला भेट देण्यासाठी शहरातील बालगोपाळांनी मोठय़ा संख्येने यावे, यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत.’’ पेशवे उद्यानाची वेळ वाढवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
८ एप्रिल १९५६ मध्ये फुलराणी सुरू झाली तेव्हा तिचे उद्घाटन केलेल्या सुगंधा शिरवळकर यांनीही पेशवे उद्यानाच्या आठवणींना उजाळा दिला. बालचमूने फुलराणीची मनसोक्त सैर केली. सूत्रसंचालन सुनील महाजन यांनी केले.