लोकसभा निवडणुकीत देशभरात आलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेने देशाची सत्ता भाजपला मिळाली. आतापर्यंत मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या उद्योगनगरीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे कमालीचा उत्साह संचारला आहे. हा आनंद साजरा करत असतानाच भाजप नेत्यांमधील पूर्वापार चालत आलेली गटबाजी कायम आहे. त्याचबरोबर, विधानसभेसाठी पिंपरी मतदारसंघावर भाजपचा दावा असताना भोसरी मतदारसंघ मागण्यावर पक्षाचा एक गट कमालीचा आग्रही असल्याने आगामी काळात महायुतीत वादंग होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
पिंपरी भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या समर्थकांचे स्वतंत्र गट असून त्यांच्यातील गटबाजीच्या राजकारणाने पक्षातील वातावरण कायम गढूळ राहिले आहे. शहरात भाजपचे हक्काचे मतदार असूनही पक्षाचे अवघे तीन नगरसेवक आहेत, त्यामागे गटबाजी हेच प्रमुख कारण आहे. आतापर्यंत मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या भाजपमध्ये मोदींनी मिळवलेल्या यशामुळे उत्साह संचारला. मात्र, या यशाचा आनंदही शहराध्यक्ष सदाशिव खाडे व माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी स्वतंत्रपणे साजरा केला. शहरातील तीनपैकी पिंपरी मतदारसंघ भाजपकडे आहे. मात्र, महायुतीतील घटक असलेल्या रिपाइंने पिंपरीची मागणी लावून धरली आहे. याशिवाय, शिवसेनेकडे असलेल्या भोसरी मतदारसंघावर एकनाथ पवारांचा डोळा आहे. या मुद्दय़ावरून यापूर्वी सेना-भाजपमध्ये खटके उडाले आहेत. आगामी काळातही पिंपरी व भोसरीवरून महायुतीत तिढा होणार असल्याची चिन्हे आतापासून दिसत आहेत.

Story img Loader