खुद्द महापौरांचाच प्रभाग म्हटल्यानंतर तेथील नागरी सुविधांचे एक चांगले चित्र सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर येत असते. बहुतांश महापालिकांत अशीच स्थिती असते. पण याला पिंपरी चिंचवड महापालिका अपवाद असल्याचे दिसून येते. महापौर नितीन काळजे यांच्या चऱ्होली गावातील नागरिकांच्या हाती मात्र निराशा आली आहे. या प्रभागात पालिकेचे रूग्णालय आहे. पण वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांअभावी येथील नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. नेमणूक करूनही वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात रूजू न झाल्याने नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. रूग्णालयाची अवस्थाही बिकट झाली आहे. अस्ताव्यस्तपणे पसरलेला कचरा, धुळ खात पडलेली औषधे, त्यामुळे हे रूग्णालयच ‘व्हेटिंलेटर’वर असल्याचे दिसत आहे.
पिंपरी चिंचवड महापलिकेत प्रथमच भाजपला सत्ता मिळाली. त्यांनीही पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चऱ्होली गावातील नितीन काळजे यांना महापौर पदाची संधी दिली. त्यामुळे आपल्या प्रभागात आता विकासाची गंगा येणार या आशेवर असणाऱ्या नागरिकांना मात्र आता निराशेला सामोरे जावे लागत आहे. गावात पालिकेचे एक रूग्णालय आहे. गेल्या काही दिवसांपासून इथे वैद्यकीय अधिकारी गैरहजेर आहेत. त्यामुळे दररोज रूग्ण येतात. पण वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे त्यांना उपचाराविना परत जावे लागत आहे. ही समस्या कायम असतानाच आता परिचारिकाही गैरहजर असल्यामुळे रूग्णांच्या अडचणीत भरच पडली आहे.

या रूग्णालयाची अवस्थाही बिकट झाली आहे. जागोजागी अस्ताव्यस्त पडलेले वैद्यकीय साहित्य, कचरा, रक्त तपासणीसाठी लागणाऱ्या साहित्यावर पडलेली धूळ, अनेक दिवसांपासून औषधांमध्येच ठेवलेले इंजेक्शन, औषधांची कमतरता यामुळे नागरिकांच्या आरोग्याप्रती पालिका किती गंभीर आहे हे दिसून येते, अशी प्रतिक्रिया काही रूग्णांनी दिली.
काहींनी थेट महापौर नितीन काळजेंकडून प्रभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. पूर्वी एक वैद्यकीय अधिकारी गावात येत असत. परंतु, त्यांची वेळ सोयिस्कर नव्हती. गेल्या काही दिवसांपासून त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही येणे बंद केले असून आता परिचाराकाही येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
या गावाची लोकसंख्या सुमारे १८ हजार इतकी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. पण ज्यांची नेमणूक आहे, ते अधिकारी, कर्मचारीही रूग्णालयात येताना दिसत नाहीत. त्यामुळे या रूग्णालयात एक कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, पुरेसे कर्मचारी व औषधे उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापौरपदी विराजमान होताना काळजे यांनी नव्याने समाविष्ट गावांना न्याय मिळवून देऊ, असा शब्द दिला होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काळजे यांनी लवकरच येथील प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले आहे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक असताना नितीन काळजे यांचे कार्य चांगले होते. त्यामुळे आम्ही त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. महापौर झाल्यापासून कार्यबाहुल्यामुळे कदाचित त्यांना प्रभागात लक्ष देता येत नसेल, अशी भावना रूग्णालयात आलेलया पापाभाई हुसेन मुलाणी यांनी व्यक्त केली. पालिकेने त्वरीत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

वैद्यकीय अधिकारी रूजू होतील
संपूर्ण शहराची जबाबदारी असल्याने पूर्ण वेळ गावासाठी देऊ शकत नाही. दवाखाना हा रस्त्यावर असल्याने आत धूळ येते. त्यामुळे रूग्णालयाचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी नव्हते. नागरिकांची तात्पुरती सोय केली होती. लवकरच पूर्णवेळी वैद्यकीय अधिकारी रूजू होतील.
नितीन काळजे, महापौर, पिंपरी चिंचवड</strong>


दोषींवर कारवाई करू

एका वैद्यकीय अधिकाऱ्याची चऱ्होली गावात नेमणूक केली आहे. त्यांना रूजू होण्यासाठी ७ दिवसांची मुदत असते. अजून ते रूजू झालेले नाहीत. औषधांचा तुटवडयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतो. उद्यापासून वैद्यकीय अधिकारी रूजू होतील. सध्या तेथे भोसरी येथील वैद्यकीय अधिकारी असतात. गैरसोंयीबाबत कोणी दोषी आढळल्यास कारवाई करू.
डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारी

Story img Loader