केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन चार महिने झाल्यानंतरही जुन्या नोटा मिळण्याचे सत्र थांबलेले दिसत नाही. पिंपरी चिंचवड येथील दिघी मॅगझिन चौकाजवळ तब्बल १ कोटी ३६ लाख २६ हजार एवढी रक्कम गस्त घालताना मिळाली आहे. या सर्व नोटा जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या स्वरूपात आहेत. एवढी मोठी रक्कम मिळाल्यामुळे पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
शुक्रवारी (दि.२४) दिघी येथील मॅगझिन चौकात सांयकाळी सहाच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना तेथून जाणाऱ्या इनोव्हा (एमएच १२ एचझेड ००७९) कारबाबत त्यांना संशय आला. त्यांनी कारची तपासणी केला असता त्यामध्ये चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १ हजार रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात १ कोटी ३६ लाख २६ हजार रुपये आढळून आल्या. पोलिसांनी या प्रकरणी चालकासह चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लेखी घेऊन त्यांना सोडण्यात आले. ही सर्व रक्कम दिघी पोलिसांनी जप्त केली असून ते प्राप्तिकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. ही कार कोणाची आहे, पैसे कोणाचे आहेत, याबाबत अजून समजू शकले नसल्याची माहिती दिघी पोलिसांनी दिली आहे. प्राप्तिकर विभागाकडून याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Story img Loader