पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ताकद पणाला लावली असली तरी, भाजपची ‘स्मार्ट’ खेळी यशस्वी ठरली आहे. भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ मधून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाला नसताना, अपक्ष उमेदवाराची ‘समजूत’ काढण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे येथील भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने भाजपने पिंपरी-चिंचवडमधून विजयी सुरूवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह भाजपनेही प्रतिष्ठेची केली आहे. उघड नाराजी, बंडाळ्या आता शमल्या असल्या तरी, एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी छुपे ‘डाव’ टाकण्याचे प्रयत्न सगळ्याच पक्षांच्या नेत्यांकडून सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सुरू असतानाच भाजपने स्मार्ट खेळीतून विजयाचे ‘कमळ’ फुलवण्यात यश मिळवले आहे. भोसरी येथील प्रभाग क्रमांक सहामधून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळाला नाही. तेच भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसले. या ठिकाणी अपक्ष उमेदवाराची ‘समजूत’ काढली. त्यामुळे येथून भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रवी लांडगे हे भाजपचे नेते अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत. भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये धावडे वस्ती आहे. शहरातून एक तरी उमेदवार बिनविरोध निवडून आणायचा, अशी रणनिती शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी आखली होती. रवी लांडगे यांच्या निवडीने ती यशस्वी ठरली आहे, असे बोलले जात आहे. गेल्या निवडणुकीत रामदास बोकड, शकुंतला धराडे या दोन्ही उमेदवारांना बिनविरोध निवडून आणले होते. २००७ मध्ये जावेद शेख यांनाही बिनविरोध निवडून आणले होते. त्यावेळी लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीत होते. दरम्यान, त्यांच्या या खेळीने भाजपने पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आणला असून विजयी आघाडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.