पिंपरी-चिंचवडमधील वाढती रहदारी, वाहतूक नियमांना हरताळ फासण्याचे प्रकार यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य रस्त्यांवर येणारे प्रवेशाचे मार्ग धोक्याचे बनले आहेत. त्यातील अनेक रस्त्यांवर गतिरोधक नाहीत, तसेच दिशादर्शक आणि सूचना फलक नसल्यामुळे मुख्य रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात अंतर्गत रस्ते येत नाहीत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरून वेगाने येणारी वाहने आणि मुख्य रस्त्यांरील मोठी वाहतूक यातूनच अपघातालाच निमंत्रण मिळत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मुख्य रस्ते प्रशस्त असले, तरी शहरांतर्गत रस्ते मात्र गुंतागुंतीचे आणि अरुंद, तर अनेक ठिकाणी चिंचोळे आहेत. शहराच्या वाढत्या विस्तारामध्ये गुंठय़ावर जागा विकताना रस्त्यांचे नियोजन झाले नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. विशेषत: काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, चिखली, रुपीनगर, चिखली मोरे वस्ती, भोसरी आदी भागातील अंतर्गत रस्ते अरुंद आणि वाहतुकीसाठी जिकिरीचे आहेत. काळेवाडीमध्ये पाचपीर चौक ते तापकीर मळ्यापर्यंतच्या रस्त्यावर अनेक सोसायटय़ा आहेत. या सोसायटय़ांमधील नागरिकांचा रहदारीचा मुख्य मार्ग हा पाचपीर चौक ते तापकीर मळा हा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना सोसायटय़ांमधील अंतर्गत रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांमुळे छोटे-मोठे अपघात घडतात. उभ्याआडव्या अंतर्गत रस्त्यांच्या सुरुवातीला फक्त सोसायटय़ांच्या नावाच्या पाटय़ा लावण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत.
शहरातील चिखली मोरे वस्ती भागात ५२ पेक्षा जास्त सोसयटय़ा आहेत. या सोसायटय़ांमधून येणारे अंतर्गत रस्ते साने चौक ते म्हेत्रे वस्ती या मुख्य रस्त्याला जोडण्यात आले आहेत. सोसायटय़ांमधील अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य रस्त्याकडे येणारी वाहने अचानक वेगात आल्यानंतर अपघात होतात. यामध्ये वाहनचालक जखमी होऊन वाहनाचेही नुकसान होते. पिंपरी गाव ते डीलक्स चौक हा रस्ता जमतानी चौकामध्ये दुभागतो. या रस्त्यावरही अशाच प्रकारची समस्या वाहनचालकांना भेडसावत आहे. याशिवाय पिंपळे सौदागर येथून दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक अंतर्गत रस्ते जोडले जात आहेत. रहाटणी फाटा ते रहाटणी गावठाण या मुख्य रस्त्याला किनारा कॉलनी, शास्त्रीनगर शिवाय रायगड कॉलनीकडून येणारा रस्ता जोडला जातो. प्राधिकरणाच्या अनेक भागात अशाच पद्धतीने येणारे धोकादायक अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला मिळतात. भोसरीमध्येही असेच प्रकार पाहायला मिळतात. आळंदी रस्ता तसेच दिघी रस्त्याला अनेक अंतर्गत रस्ते जोडले आहेत. ज्या ठिकाणी अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला जोडले आहेत त्या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना मुख्य रस्ता कोठे मिळतो हे लक्षात येत नाही. अंतर्गत रस्ता ज्या ठिकाणी मुख्य रस्त्याला मिळतो, त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज आहे. गतिरोधक बसविण्याला मर्यादा असल्या तरी दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक, रात्रीच्या वेळी चकाकणाऱ्या निऑन साइनच्या पाटय़ा लावणे प्रशासनाला शक्य आहे. मात्र तशी प्रक्रिया महापालिकेकडून झालेली नाही.