पवार, पृथ्वीराज चव्हाण, विखे, नक्वी यांचे राजकीय मेळावे

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची हॅटट्रिक करण्याची मनीषा, भाजप-शिवसेनेचे िपपरी पालिका ताब्यात घेण्याचे मनसुबे आणि काँग्रेसची पूर्ववैभव मिळवण्यासाठी धडपड व त्यासाठी आतापासूनच सुरू झालेले राजकीय डाव-प्रतिडाव यामुळे िपपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकांचे वातावरण शहरात तापू लागले आहे. पुढील पाच दिवसांत भाजपचे केंद्रातील संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे शहरात पक्षीय दौरे होत आहेत. त्यानिमित्त राजकीय मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याने शहरातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघणार आहे.

केंद्रातील सत्तेला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने व आगामी पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, भाजपने गुरुवारी (२३ जून) चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले असून मुख्तार नक्वी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर, पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी (२४ जून) शरद पवार यांचा शहरात दौरा आहे. दुपारी साडेतीन वाजता थेरगाव येथील बाळकृष्ण मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शकुंतला धराडे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर, सायंकाळी चिंचवड-मोहननगर येथे पवार यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (२७ जून) काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा ऑटो क्लस्टरला होणार आहे. सकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील समारोपप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत. शहराध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णूपंत नेवाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मेळाव्यात डॉ, रत्नाकर महाजन, राजू वाघमारे, भूपेंद्र गुप्ता, अमरदीप पाटील यांचेही मार्गदर्शन होणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकापाठोपाठ होणाऱ्या या ‘राजकीय’ कार्यक्रमांमुळे शहरातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघणार आहे.

Story img Loader