पूर्वीच्या एकत्रित काँग्रेसला व अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक निवडणुका तसेच विधानसभेच्या वेळी भरभरून मतदान करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांची लोकसभा निवडणुकीत विरोधात कौल देण्याची अनेक वर्षांची परंपरा असून यंदाही ती कायम राखली आहे. या परंपरेचा फटका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही सातत्याने बसला व त्यातूनच मतदारसंघांची पुनर्रचना करताना पिंपरी-चिंचवडला बारामतीतून वगळण्यात आल्याचे मानले जाते.
बारामतीत दौंड, शिरूर, इंदापूर, पुरंदर, बारामती आणि हवेली तालुक्याचा समावेश होता. तरीही एकटय़ा हवेलीत ४० टक्के मतदान होते व त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश होता. मताधिक्य असो की घट हवेलीची भूमिका निर्णायक ठरत होती. १९७७ मध्ये संभाजीराव काकडे, १९८० ला शंकरराव बाजीराव पाटील, १९८४ शरद पवार, १९८९ शंकरराव पाटील, १९९१ अजित पवार यांनी बारामतीचे प्रतिनिधीत्व केले. १९९३ मध्ये केंद्रातून शरद पवार राज्याच्या राजकारणात परतले. पुन्हा १९९६ मध्ये बारामतीतून निवडून गेले. १९९९ मध्ये रामकृष्ण मोरे पवारांच्या विरोधात उभे राहिले व पराभूत झाले. इतर निवडणुकांमध्ये वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मतदार लोकसभेसाठी शरद पवारांना मते टाकत होता, हा प्रकार सहापैकी पाच तालुक्यात सर्रास दिसून येत होता. हवेलीत विशेषत: पिंपरी-चिंचवडला तसे घडत नव्हते. पवारांसारखा दिग्गज नेता रिंगणात असतानाही विरोधी मतदान होत होते.
पवारांसमोर उभा करण्यासाठी उमेदवार शोधावा लागत होता. मात्र, त्यास भरभरून मतदान झाल्याचे अनेक निवडणुकांमधून स्पष्ट झाले. कमी मतदानाची सल पवारांना कायम राहिली. भाजप तसेच संलग्न पक्षांची हक्काची मते, पवारांची तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची कामगार विरोधी प्रतिमा त्यास कारणीभूत होती. वर्षांनुवर्षे त्यात बदल झाला नाही. अखेर, मतदारसंघांची पुनर्रचना करताना पिंपरी-चिंचवडला बारामतीतून वगळण्यात आले. मावळ-शिरूरमध्ये शहराची वाटणी करण्यात आली. तरीही हा विरोधी कौल कायम असून दोन्ही लोकसभा निवडणुकीत मतदारांनी तो दाखवून दिला आहे.
शरद पवारांना १९९६ च्या निवडणुकीत हवेलीत एक लाख १४ हजार २१५ तर प्रतिस्पर्धी शंकरराव पाटील यांना एक लाख दोन हजार ७०८ मते मिळाली होती. १९९८ मध्ये पवारांना एक लाख ५२ हजार तर विरोधी पक्षाच्या विराज काकडेंना एक लाख १६ हजार मते मिळाली. १९९९ मध्ये पवारांना एक लाख एक हजार तर प्रतिस्पर्धी भाजपच्या डॉ. प्रतिमा लोखंडेंना ९५ हजार मते होती. यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात असलेल्या रामकृष्ण मोरेंना हवेलीत ६५ हजार मते मिळाली होती. २००४ च्या निवडणुकीत पवारांना एक लाख ६५ हजार आणि भाजपच्या पृथ्वीराज जाचकांना ९१ हजार २७५ मते मिळाली होती.
लोकसभेला विरोधी कौल देण्याची पिंपरी-चिंचवडची परंपरा कायम!
पिंपरी-चिंचवडकरांची लोकसभा निवडणुकीत विरोधात कौल देण्याची अनेक वर्षांची परंपरा असून यंदाही ती कायम राखली आहे. या परंपरेचा फटका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही सातत्याने बसला.
First published on: 21-05-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwads tradition continued this time also