‘प्रतिमा बांधणी’च्या दृष्टीने आयुक्त राजीव जाधव यांनी शहरात पाहणी दौरा सुरू केला असला, तरी दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईत जावे लागले. दौऱ्यात खंड पडू नये म्हणून अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी मंगळवारी केलेल्या पाहणीत पदपथावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे आढळून आली. ती तातडीने काढून टाकण्याचे आदेश शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
शहरातील समस्यांची माहिती व्हावी, यासाठी आयुक्तांनी सोमवारी चिंचवडपासून पाहणी दौरा सुरू केला. दुसऱ्या दिवशी ते मुंबईला गेल्यानंतर तानाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अभियंता महावीर कांबळे, सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी, प्रभाग अधिकारी दत्तात्रय फुंदे आदींनी दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, महार्गावरील परिसर, पिंपरी चौक, संत तुकारामनगर, महेशनगरची पाहणी केली. या वेळी पदपथावर जागोजागी अतिक्रमण असल्याचे दिसून आले. पदपथ नागरिकांना चालण्यासाठी बांधण्यात आल्याचे सांगत ते तातडीने मोकळे करून देण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहे. सकाळी आठपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात क प्रभागाचे अध्यक्ष सोनाली जम, नगरसेवक राजेंद्र काटे, सुजाता पालांडे, सनी ओव्हाळ आदी सहभागी झाले होते.

खांब कोणाचा?
फुगेवाडीत रस्त्याच्या कडेला विजेचा मोठा खांब पडला होता. अतिरिक्त आयुक्तांनी हा खांब कोणाचा आहे, अशी विचारणा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा तो आपला नाही, वीज महामंडळाचा असेल, असे उत्तर त्याने दिले. कितीतरी दिवसांपासून हा खांब पडून आहे आणि तुम्हाला तो कोणाचा आहे, हे माहिती नाही, कशी कामे करता, अशा शब्दात िशदे यांनी कानउघडणी केल्यानंतर तो खांब हलवण्यात आला.