पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची सफाई व नदीत साठलेली जलपर्णी काढण्याच्या कामात आतापर्यंत पालिकेचे अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधींचे टक्केवारीचेच राजकारण होत होते. वर्षांनुवर्षे संगनमताने व बिनबोभाटपणे पालिकेची लूट होत होती, त्यास आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी चाप लावला आहे. त्यामुळे अनेकांची दुकानदारी अडचणीत आली आहे.
पावसाळ्यात नाले तुंबू नयेत, पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने व्हावा, नागरी वस्तीत पाणी शिरू नये व आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, या हेतूने आयुक्तांनी नालेसफाईच्या कामाकडे स्वत: हून लक्ष घातले. अधिकाऱ्यांच्या अहवालावर विश्वास न ठेवता आयुक्तांनी स्वत:च पाहणी दौरा केला, तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी आढळून आल्या. मोरवाडी, खराळवाडी, रहाटणी आदींसह बऱ्याच भागात नाले अस्वच्छ असल्याचे दिसून आले. संबंधितांना तंबी देत आयुक्तांनी तेथे पुन्हा भेट देणार असल्याचे स्पष्ट केल्याने त्या कामातून सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे. चिंचवड लिंक रस्त्यावरील मैलाशुध्दीकरण प्रकल्प व लगतच्या नाल्यातून दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत होते. त्यावरून आयुक्तांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
वास्तविक,पिंपरी पालिकेत ठराविक ठेकेदारांची राजकीय आशीर्वादाने वर्षांनुवर्षे दुकानदारी चालते, हे उघड गुपित आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्यात एकतर भागीदारी असते, अन्यथा भरगच्च टक्केवारी ठरलेली असते. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आपला वाटा सोडला, असे काही होत नाही. काही नगरसेवकच ठेकेदार असून दुसऱ्याच्या नावाखाली ठेका घेऊन पालिका लुटण्याचे काम वर्षांनुवर्षे ते करत आहेत. सध्या नालेसफाईसाठी एका प्रभागात १० लाख याप्रमाणे चार प्रभागाची मिळून ४० लाख रूपयांची तरतूद आहे. यापूर्वी ही तरतूद खूप जास्त होती. वेळप्रसंगी अन्य कामांचे पैसे नालेसफाईसाठी वर्ग केल्याची उदाहरणे आहेत. ठेकेदारांकडून व्यवस्थित नालेसफाई होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. ठेका दिला असतानाही पालिका कर्मचाऱ्यांकडून नाले साफ करून घेतले गेले आहेत. अगदी नियोजनबध्दपणे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची व जलपर्णी काढण्याची कामे काढली जात होती. मान्सूनपूर्व पाऊस किंवा पहिल्या पावसात जलपर्णी वाहून गेली की आपसूकच नालेसफाई होत होती. त्यामुळे कमी कष्टात व कमी खर्चात ठेकेदारांचा जास्त फायदा होत होता व त्यात ठरलेले वाटेकरी होतेच. तथापि, आयुक्त डॉ. परदेशी यांनी या खाबुगिरीला बऱ्यापैकी चाप लावला आहे.

Story img Loader