चिंचवडच्या ‘एम्पायर इस्टेट’ वसाहतीतील रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. संबंधित कंपनीने तातडीने काम पूर्ण करावे अन्यथा घरी जावे, अशी निर्णायक भूमिका आयुक्त राजीव जाधव यांनी घेतली आहे.
‘एम्पायर इस्टेट’च्या उड्डाणपुलाचे काम ‘गॅमन इंडिया’ कंपनीला देण्यात आले. मात्र, मुदत संपूनही पुलाचे अवघे ३० टक्के काम पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तीन वर्षांपासून त्रस्त असलेल्या येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा पवित्रा घेतला व रास्ता रोको करण्याचा तसेच पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. त्यापाठोपाठ, स्थायी समितीच्या सभेत या विषयाचे पडसाद उमटले. त्याची दखल आयुक्तांनी घेतली आहे. यासंदर्भात, आयुक्त जाधव म्हणाले,की अजितदादांच्या उपस्थितीत यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. संबंधित कंपनी दाद देत नसल्याने आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. कंपनीने यापूर्वी अशाचप्रकारे संथ कामे केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कंपनीला ठराविक मुदत देऊन उर्वरित काम पूर्ण करून घ्यावे लागेल, अन्यथा त्यांचा ठेका रद्द करून नव्या कंपनीला काम द्यावे लागेल, असे पर्याय आमच्यासमोर आहेत. मंत्रालयातील बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
 
चिंचवडच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढू’
मोरवाडीचा सिग्नल ते चिंचवड स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर व वाहतूक पोलिसांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या असून या मार्गावर गर्दी का होते, हे तपासून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.