राज्यशासनाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ या राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी पालिकेला १० लाखाचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. उत्तम पारदर्शी कामकाज व लोकाभिमुख कारभाराबद्दल हे बक्षीस देण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त राजीव जाधव, प्रशासन अधिकारी डॉ. उदय टेकाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. द्वितीय क्रमाकांचे सहा लाखाचे बक्षीस नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला तर चार लाखाचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान संचालनालयाला मिळाले आहे. बक्षिसाची रक्कम प्रशासकीय सुधारणांच्या कामासाठीच वापरण्यात यावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे. िपपरी पालिकेतील प्रशासकीय कामकाज, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या चांगल्या सुविधा, संकेतस्थळ सुधारणा, सारथी, नागरिकांची सनद, तक्रारींचे निवारण, अधिकारांचे विकेंद्रीकरण, आर्थिक व्यवस्थापन आदी उपक्रमांची दखल घेत पालिकेची बक्षिसासाठी निवड करण्यात आली. यातील बहुतांश उपक्रम यापूर्वीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केले, त्यात डॉ. टेकाळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून हे उपक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.

Story img Loader