पिंपरी महापालिका आणि दक्षिण कोरियातील गुनसान शहराच्या मैत्री कराराला दहा वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त तेथील एका प्रमुख चौकास ‘पिंपरी-गुनसान मैत्री चौक’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती तेथील दौऱ्याहून परतलेल्या महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुनसान शहरातील अनेक गोष्टी अनुकरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशभरात ‘बेस्ट सिटी’ ठरलेल्या पिंपरी-चिंचवडच्या विविध प्रकल्पांचे दक्षिण कोरियात सादरीकरण करण्यात आले.
महापौरांसह ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा आरती चोंधे, नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, भारती फरांदे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. ‘गुनसान’च्या विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर शिष्टमंडळाने गुनसान शहरातील ‘टाटा-देवू’ कारखान्याला भेट दिली. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्कॉन क्जू कीम, उपाध्यक्ष झकेरिया सैन, पी. संत प्रसाद यांनी त्यांचे स्वागत केले. महापौर म्हणाल्या की, तेथील रस्त्यांचे ब्लॉक, झाडांची रचना, पदपथांवरील झाडे, झाडांची निगा, कमी खर्चात विकसित करण्यात आलेले लॉन आदी गोष्टी अनुकरणीय आहेत. अवघे पावणेतीन लाख लोकसंख्या असलेल्या त्या शहरात मोठे रस्ते आहेत, मात्र बिलकुल टपऱ्या नाहीत. आपल्याकडे २० लाख लोकसंख्या असल्याचे ऐकून तेथील पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. गुनसान शहराचे शिष्टमंडळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहे, त्याच वेळी ते िपपरी-चिंचवडला भेट देणार आहे.

Story img Loader