पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. शहरामध्ये ३५ ते ४० हजार अवैध रिक्षा कोणताही परवाना नसताना प्रवासी वाहतूक करीत असल्याची तक्रार परवानाधारक रिक्षा चालकांनी केली आहे. वाहतूक पोलिसांशी संगनमत करून हे रिक्षा चालक बिनदिक्कतपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यातील बहुतांशी रिक्षाचालकांकडे वाहन चालविण्याचाही परवाना नाही. तसेच रिक्षाचा विमाही उतरविला जात नाही. तरीही या वाहतुकीवर कोणतीही कारवाई होत नाही.

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत पाच हजार रिक्षांना रिक्षा चालविण्याचा परवाना आहे. नियमानुसार फक्त या रिक्षा चालकांनाच प्रवासी वाहतूक करण्याचा अधिकार आहे. प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे भाडे आकारले पाहिजे, असा दंडक असताना रिक्षा चालक सर्रास नियमाला हरताळ फासून प्रवाशांकडून जादा भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. पाच हजार परवानाधारक रिक्षांशिवाय शहरामध्ये ३५ ते ४० हजार रिक्षा विनापरवाना प्रवासी वाहतूक करतात. या वाहतुकीत तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी घेतले जातात.

पाच ते सहा प्रवासी कसेही दाटीवाटीने बसवून धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे चित्र शहरात दिसते. मात्र, या वाहतुकीकडे वाहतूक पोलीस डोळेझाक करतात. विनापरवाना रिक्षांमुळे परवानाधारक आणि आरटीओचे सर्व कर भरणाऱ्या रिक्षाचालकांना नुकसान सहन करावे लागत असल्याची तक्रार आहे.

अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा परवाना नाही. गणवेश, रिक्षाचा विमा, बॅज आदी काहीही नसताना त्यांच्याकडून प्रवासी वाहतूतक केली जाते. एका रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीनुसार वाहतूक पोलिसांनी वसुलीसाठी ‘झीरो पोलीस’ (खाजगी व्यक्ती) नेमले आहेत. शहरामधील गर्दीच्या आठ ते दहा मार्गावर असे विनापरवाना रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करतात. आरटीओ कार्यालयाकडूनही विना परमीट रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशा रिक्षाचालकांना कोणाचाही धाक नाही.

पिंपरी-चिंचवडमधील अवैध रिक्षा वाहतूक बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे वारंवार मागणी केली आहे. शहरामध्ये ३५ ते ४० हजार अवैध रिक्षा विनापरवाना प्रवासी वाहतूक करतात. श्रीधर काळे, अध्यक्ष, क्रांती रिक्षा संघटना

परवाना नसताना चालवल्या जाणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यासाठी लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशा रिक्षांवर या आधी कारवाई करण्यात आली होती.

आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात वारंवार कारवाई केली जाते. अशा रिक्षा आढळल्यास कारवाई केली जाईल. वाहतूक पोलीस रिक्षा चालकांकडून पैसे घेत असतील, असे मला वाटत नाही.

राजेंद्र भामरे, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग, पिंपरी

Story img Loader