‘खर्चिक’ हारतुऱ्यांचा वापर न करता सर्वार्थाने उपयुक्त ठरू शकतील, अशा बियांचे वाटप करण्याचा निर्णय पिंपरी महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, यापुढील काळात महापालिकेच्या विविध कार्यक्रमांमध्ये हारतुऱ्यांचा वापर दिसणार नाही, तर मान्यवरांना झाडांच्या बियांचे वाटप केले जाणार आहे.
पिंपरी महापालिकेच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी पुष्पगुच्छ, हारतुरे यांचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो व त्यासाठी बराच खर्चही करावा लागतो. हा खर्च टाळण्याबरोबरच महापालिकेने वृक्षसंवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे काम यानिमित्ताने केले आहे. पालिकेच्या वतीने ‘झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा’ ही मोहीम वर्षभर राबवण्यात येते. त्यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याची गरज आहे. या गोष्टीचा प्रसार करण्यासाठी शहरात मोठय़ा प्रमाणात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. सर्व नगरसेवक, सार्वजनिक मंडळे,सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमींना विविध झाडांच्या १०० ते २०० बियांचा पुडा देण्यात यावा, जेणेकरून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश चांगल्या प्रकारे देता येईल, असे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.

Story img Loader