पिंपरी-चिंचवड शहराला पर्यटनस्थळ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला होता. त्यासाठी अडीच ते तीन हजार कोटी रूपये खर्चाचे नियोजनही करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात शहरातील महत्त्वाची १६ ठिकाणे विकसित करण्याचे नियोजन होते. मात्र, खर्चाचे मोठे आकडे पाहून अनेकांनी टक्केवारीचे गणित मांडले, त्यातून अनेक घोळ सुरू झाले. नेमके कोणते स्थळ विकसित करायचे, यावरून चढाओढ आणि राजकारण सुरू झाले. अखेर एकात्मिक आराखडय़ाचे तीन तेरा वाजले.
तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये आराखडय़ाची अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात १०८ कोटी रूपये खर्च करून सहा ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र, अन्य कामे निधीअभावी लांबणीवर टाकण्यात आली आहेत.
दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला. शहरातील मुळातच प्रसिध्द असलेली काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने आणखी विकसित करण्याचे ठरले. मुंबईतील प्रख्यात वास्तुविशारदाला बोलावून सादरीकरण करण्यात आले. या एकात्मिक प्रकल्पासाठी अडीच ते तीन हजार कोटी रूपये खर्चाचे नियोजन ठरले. त्यादृष्टीने काम सुरू होण्यापूर्वीच नको ते ‘उद्योग’ सुरू झाले. प्रकल्पाच्या खर्चाचे मोठे-मोठे आकडे पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले. जो-तो आपापल्या टक्केवारीचे गणित मांडू लागला. बडे अधिकारी हा प्रकल्प आपल्याकडे यावा, यासाठी प्रयत्न करू लागले. पर्यटन विकासासाठी आपल्या प्रभागातील स्थळे निश्चित व्हावीत, यासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू झाली. विकासाची मोठी कामे आपल्याला पदरी पडावी, यासाठी ठेकेदार व कंत्राटदारांमध्ये चढाओढ सुरू झाली. शहराच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असणाऱ्या या आराखडय़ाला अर्थकारण व राजकारणाचा विळखा बसू लागल्याने त्याचे ‘तीन तेरा’ वाजले. पुढे ‘एकात्मिक’ विकास हे सूत्र बाजूला ठेवण्यात आले. प्रत्येक काम वेगळे काढून त्याचा वेगळाच ‘विकास’ करण्याचे ठरले. त्यामुळे अप्रत्यक्षपणे ‘वाटण्या’ झाल्याचे चित्र पुढे आले.
पहिल्या टप्प्यातील १६ पैकी अवघी सहा ठिकाणे निश्चित करण्यात आली. चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, चिंचवड स्टेशनला रेल्वे स्थानक परिसरात ‘वॉर्ड सेंटर’ उभारणे, ‘सायन्स पार्क’समोर तारांगणाची उभारणी, आकुर्डी-प्राधिकरणात बहुउद्देशीय दुहेरी नाटय़गृहाची बांधणी, संभाजीनगर येथे ‘मॉडेल वॉर्ड’ विकसित करणे आणि भोसरीच्या गवळी माथा येथे ‘बालनगरी’ची उभारणी विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निविदा काढण्यात आल्याने जवळपास १०८ कोटींची कामे मार्गी लागलेली आहेत. याशिवाय, संभाजीनगर येथे पीएमपीचा डेपो व मोरवाडीत भव्य कलानाटय़गृह उभारण्याचे काम रांगेत आहे. डेपोसाठी ६० कोटी रूपये खर्च अपेक्षित असून काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम खोळंबले आहे. कलानाटय़गृहासाठी ५० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. येथील आरक्षण वापराचा फेरबदल हा विषय शासनदरबारी प्रलंबित असल्याने तेही काम रखडले आहे. याशिवाय, पहिल्या टप्प्यातील सहा कामे मार्गी लागली असली तरी अन्य स्थळे विकसित करण्यासाठी पालिकेकडे सध्या पैसे नाहीत. अनेक ठिकाणी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे पुरेसा निधी व जागा ताब्यात आल्याशिवाय पर्यटनाचा गाडा पुढे सरकणार नाही, असे दिसून येत आहे.