िपपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची निगडी येथील गेल्या तीन वर्षांपासून मोकळी असलेली इमारत उत्पादन शुल्क विभागाला भाडेतत्त्वावर दिली आहे. यामुळे प्राधिकरणाच्या तिजोरीत वर्षांकाठी २५ लाख रुपयांची भर पडणार आहे.

िपपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय २०१३ पूर्वी निगडी येथील इमारतीमध्ये सुरू होते. प्राधिकरणाने आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ पर्यावरणपूरक सात मजली इमारत बांधली. त्यामुळे जुन्या इमारतीमधील कामकाज बंद करून ते आकुर्डी येथील इमारतीमध्ये सुरू केले होते. वर्षभराने या जुन्या इमारतीमधील अर्धा भाग िपपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी देण्यात आला. तर, इमारतीचा अर्धा भाग वापराविना पडून होता. वापर होत नसल्यामुळे देखभालीचा खर्च प्राधिकरण प्रशासनाला करावा लागत होता.

उत्पादन शुल्क विभागाने प्राधिकरण कार्यालयाकडे निगडी येथील इमारतीमधील रिकामी जागा भाडेपट्टय़ाने मागितली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून रिकामा असलेला इमारतीचा अर्धा भाग भाडेपट्टीने देण्यास प्राधिकरण सभेत मंजुरी देण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाला भाडेपट्टीने देण्यात आलेले इमारतीचे क्षेत्रफळ ८०२ चौरस मीटर इतके आहे. दरमहा २ लाख १३ हजार रूपये इतके भाडे उत्पादन शुल्क विभाग प्राधिकरणाला देणार आहे. उत्पादन शुल्क विभागाला ही जागा तीन वर्ष मुदतीच्या करारावर भाडय़ाने देण्यात आली आहे.