पिंपरीतील रखडलेला जिजामाता रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा विषय मार्गी लागण्याची चिन्हे असून १२५ खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ‘बीओटी’ तत्त्वावर रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार होते. तथापि, त्यावरून बरेच वादविवाद झाल्याने पालिकेने तो नाद सोडून दिला व आता महापालिकाच विस्तारीकरणाचे काम करणार आहे.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील विभागीय रुग्णालये सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिजामाता रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार, चार मजली इमारत उभारण्यात येत आहे. तत्पूर्वी, इमारत रिकामी करण्यात येणार असून महत्त्वाचे विभाग लगतच्या शाळेत तात्पुरते स्थलांतिरत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रसूतिगृह व ओपीडीचा समावेश आहे. तथापि, शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सुनीता वाघेरे यांनी हा विषय उपस्थित केला, तेव्हा येत्या १५ दिवसांत विस्तारीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यापूर्वी, हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर होणार होता. काँग्रेसचा एक स्वयंघोषित नेता व त्याचा भागीदार ठेकेदार यांनी यामध्ये फारस रस घेतला होता. या विषयावरून बरेच वाद झाले. निळी रेषेत जागा येत होती, त्यामुळे काही अडचणी येत होत्या. अखेर, महापालिकेने स्वत:च हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.