राज्यातील बावीस महापालिकांचे सुधारित वर्गीकरण राज्य शासनाने जाहीर केले असून त्यानुसार पुणे महापालिकेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे, तर पिंपरी महापालिकेला ‘ब’ वर्ग देण्यात आला आहे. पुणे महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्ग महापालिकेत होता, तर पिंपरीचा समावेश ‘क’ वर्ग महापालिकेत होता. नागपूरलाही ‘ब’ वरून ‘अ’ वर्ग देण्यात आला असून मुंबई महापालिकेला ‘अ प्लस’ वर्ग देण्यात आला आहे. पुणे महापालिकेला ‘अ’ वर्ग मिळाल्यामुळे केंद्र व राज्याकडून मिळणारे अनुदान तसेच कर्मचारी संख्येत वाढ होईल.
प्रशासकीय व तांत्रिक कामात सुसूत्रता आणि समानता आणण्यासाठी, तसेच महापालिकांचे आर्थिक स्रोत, स्वत:चे उत्पन्न लक्षात घेऊन कमकुवत महापालिकांना केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणारे अनुदान, आर्थिक साहाय्य यांचे निकष ठरवण्यासाठी बावीस महापालिकांचे वर्गीकरण २००१ मध्ये करण्यात आले होते. हे वर्गीकरण निश्चित करताना लोकसंख्या, दरडोई स्वत:चे उत्पन्न व दरडोई क्षेत्रफळ याचा विचार करण्यात आला होता. तसेच, जनगणनेची आकडेवारी दहा वर्षांनी उपलब्ध झाल्यानंतर महापालिकांचे फेरवर्गीकरण करण्याचीही तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकांचे फेरवर्गीकरण करण्यात आले आहे.
पंचवीस लाख ते एक कोटी एवढी लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न आठ हजार रुपयांपेक्षा जास्त असा निकष ‘अ’ वर्ग महापालिकांसाठी होता. त्यानुसार पुण्याला ‘अ’ वर्ग देण्यात आला आहे. राज्यातील सव्वीस महापालिकांपैकी पुणे आणि नागपूर या दोन महापालिका ‘अ’ वर्गात आहेत. पंधरा ते पंचवीस लाख लोकसंख्या आणि पाच हजारांपेक्षा अधिक दरडोई उत्पन्न असा निकष ‘ब’ वर्गासाठी होता. त्या निकषानुसार िपपरी महापालिकेला ‘ब’ वर्ग मिळाला आहे.
पुणे महापालिकेला ‘अ’ वर्ग मिळाल्यामुळे केंद्र शासनाचे विविध प्रकल्प शहरासाठी आणणे, तसेच केंद्राकडून व राज्याकडून मिळणारे अनुदान आणि अर्थसाहाय्य यात आता महापालिकेला प्राधान्य मिळेल. तसेच कर्मचारी संख्याही वाढवून मिळेल, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

Story img Loader