तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलचा कारभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवसापासून धडाकेबाज कामगिरी करण्यास सुरूवात केली आहे. ऑन ड्युटी झोपा काढणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना निलंबित करून दोन दिवस उलटत नाहीत तोपर्यंत आज आणखी १० कर्मचाऱ्यांना याच कारणासाठी निलंबित करण्यात येणार आहे. तपासणी पथकाला मंगळवारी रात्री दोन ते चारच्या सुमारास पीएमपीएलच्या पिंपरी आणि निगडी डेपोमध्ये हे १० कर्मचारी झोपलेले आढळून आले होते.
तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलच्या सर्व डेपोंची रात्री अचानक तपासणी करण्यासाठी चार जणांचे पथक नेमले आहे. हे पथक सर्व डेपांमध्ये जाऊन अचानक भेट देते. या पथकाच्या तपासणीतच निगडी, पिंपरी आणि भोसरी डेपोमधील झोपलेल्या १० कर्मचाऱ्यांना आज निलंबित केले जाणार आहे. यामध्ये निगडीतील ४, भोसरीतील ३, पिंपरीचे २ आणि एक डेपोतील चालक असून या सर्वांची रात्रपाळी होती. आपल्या कामाच्या वेळेत त्यांनी जागे असणे आवश्यक असताना ते झोपलेले आढळल्यामुळे तपासणी पथकाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी रामनवमीची सुटी असल्याने त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. आज त्यांना निलंबित करण्यात येईल, असे पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. १० पैकी ९ कर्मचारी हे वर्कशॉपमध्ये काम करतात तर एक कर्मचारी चालक आहे.

Story img Loader