केवळ तुमच्यामुळेच माझ्या कवितांना आणि मलाही अस्तित्व आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी रसिकांना ‘सलाम’ केला. ‘शतदा प्रेम करावे’ असेच ‘माझे जीवनगाणे’ असलेल्या ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये हृद्य सत्कार करण्यात आला. त्या वेळी ही कृतज्ञतापूर्ण भावना पाडगावकरांनी व्यक्त केली.
अजय धोंडगे प्रॉडक्शनतर्फे मंगेश पाडगावकर यांच्या कविता आणि गीतांवर आधारित ‘माझे जीवनगाणे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे औचित्य साधून ‘पद्मभूषण’ मिळाल्याबद्दल पाटबंधारेमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पाडगावकर यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, राज्य मराठी पत्रकार संघाचे संजय भोकरे, अजय धोंडगे याप्रसंगी उपस्थित होते.
मंगेश पाडगावकर म्हणाले, ‘तुज पाहिले, तव वाहिले नवपुष्प हे हृदयातले’ ही पहिली कविता वयाच्या १४ व्या वर्षी केली. गेली ७० वर्षे कविता करीत आहे. आता ८४ व्या वर्षी पाय लटपटतात. पण, कविता नाही. तुम्ही दाद दिल्यामुळे माझ्या कवितांना आणि मलाही अस्तित्व आहे. केवळ माझ्याच नव्हे तर, अन्य कवितांवरही असेच प्रेम करा. त्यामुळे मराठी भाषा खऱ्या अर्थाने जिवंत राहील.
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, फग्र्युसन महाविद्यालयात शिकत असताना ऐकलेली अरुण दाते यांची गाणी, मंगेश पाडगावकर-वसंत बापट-विंदा करंदीकर यांचे काव्यवाचन ही सोबत घेऊनच आयुष्याचा प्रवास झाला आहे. पाडगावकर हे तर, रसिकहृदयसम्राट आहेत. काव्यातून मांडलेला जीवनाविषयीचा विधायक दृष्टिकोन आणि तत्त्वज्ञान कायम राहील.
‘यांचं असं का होतं कळत नाही’, ‘सलाम’, ‘गाय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं’ यांसारख्या कविता पाडगावकरांनी सादर केल्या. मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. हृषीकेश रानडे, शमिका भिडे, अनघा पेंडसे, अजय पूरकर, जितेंद्र अभ्यंकर यांनी पाडगावकरांची अजरामर गीते सादर केली.

Story img Loader