पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी आणखी नवीन सहा पोलीस ठाणी मंजूर झाली आहेत. त्यासाठी अकराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्तालयासाठी एकूण दीड हजार पोलीस मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे. शहरात सध्या ३३ पोलीस ठाणी असून आता त्यांची संख्या ३९ वर पोहोचणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा झपाटय़ाने विकास होत आहे. शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब असल्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या वेगाने वाढू लागली आहे. लोकसंख्या वाढीबरोबरच शहरातील गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. त्यात काही महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुणे ग्रामीण मधील २५ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षिततेचा अतिरिक्त ताण पडू लागला आहे. त्यामुळे शहरातील मोठी असलेल्या सहा पोलीस ठाण्यांचे विभाजन करून त्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यास शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
कोथरूड पोलीस ठाण्याचे विभाजन करूण नवीन अलंकार पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. तर, येरवडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून चंदननगर हे नवीन पोलीस ठाणे होणार आहे. हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्याचे विभाजन करून वाकड हे नवीन पोलीस ठाणे करण्यात येईल. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन खडकवासला हे पोलीस ठाणे होणार आहे. नवीनच दिघी आणि सिंहगड रोड ही पोलीस ठाणी होणार आहेत. अलंकार, चंदननगर, वाकड आणि खडकवासला पोलीस ठाण्यासाठी प्रत्येकी तीन पोलीस निरीक्षक, सहा सहायक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह एकूण १८० पोलीस मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे. तर सिंहगड रोड आणि दिघी पोलीस ठाण्यासाठी प्रत्येकी १६२ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मंजूर करण्यात आले आहेत.
वाहतूक शाखेसाठी २६५ पोलीस मनुष्यबळ
पुणे शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा वाहतूक आहे. त्यावर नवीन पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष दिले आहे. मंजूर झालेल्या एकूण मनुष्यबळापैकी २६५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाहतूक शाखेसाठी मंजूर केले आहेत. त्यामध्ये आठ पोलीस निरीक्षक, १८ सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक आहेत. वाहतूक शाखेसाठी आता एकूण १६५० मनुष्यबळ झाले असून त्यापकी प्रत्यक्ष १०५३ हे उपलब्ध आहे. त्याच बरोबर पोलीस ठाण्यांबरोबरच पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी कक्ष, नक्षलवाद विरोधी कक्ष, आर्थिक आणि सायबर सेल, कैद्यांना नेण्या-आणण्यासाठीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  •   – नवीन पोलीस ठाणी : अलंकार, चंदननगर, वाकड,     खडकवासला,                 सिंहगड रोड, दिघी
    • पुणे पोलीस आयुक्तालयासाठी दीड हजार पोलीस मनुष्यबळ

Story img Loader