पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद चौधरी (वय २१ रा.कुडाळवादी चिखली पुणे) आणि नौशाद शेख (वय १९) हे दोघे वाल्हेकरवाडी येथे रात्रीच्या वेळी भरधाव वेगात दुचाकीवरून जात होते, तेव्हा गस्त घालणाऱ्या चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून नऊ दुचाकीसह एक मोबाईल जप्त करण्यात आला.

तर दुसऱ्या घटनेत सुरेश जाधव (वय २७ रा.रामनगर चिंचवड) आणि अविनाश मोहिते (वय२३ रा.चिंचवड) या दोघांना दुचाकीवरून फिरत असताना अटक करण्यात आली. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पाठलाग करत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीनंतर सागर राम भडकवाड या आरोपीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ दुचाकी, ६० ग्रॅम सोनं, सात एल सी डी टीव्ही, आणि ४४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली  या आरोपींनी पिंपरी-चिंचवड परिसरात १० घरफोड्या केल्या आहेत. या पाच जणांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, प्रशांत महाले, विलास होनमाणे यांनी केली.⁠⁠⁠⁠