मतांचे राजकारण आणि केवळ प्रसिद्धीसाठीच आंदोलनांचे प्रमाण अधिक
आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ‘राजकीय’ वातावरण तापू लागले आहे. मतांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांची निवेदने आणि त्यांच्या आंदोलनांची संख्या खूपच वाढली आहे. कधी फुटकळ तर काही वेळा केवळ प्रसिद्धीसाठीच आंदोलनांचे ‘फोटोसेशन’ करण्यात येत आहे. यातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची इच्छाशक्ती किती आणि राजकीय पोळी भाजण्याची गणिते किती, हा संशोधनाचा विषय आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकांना जेमतेम आठ महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या व्यूहरचना, बैठकांचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. मतदारांच्या हक्कांसाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपणच किती तत्पर आहोत, हे दाखवण्यासाठी अर्ज, विनंत्या, निवेदने, मोर्चे, आंदोलने असे विविध प्रकार हाताळण्याचे काम राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. ज्या विषयांकडे ढुंकूनही पाहिले नाही, असे विषय प्राधान्याने हाताळले जात आहेत. एखादा प्रश्न सुटावा, यापेक्षा आंदोलनाला अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी, त्याचे राजकीय श्रेय आपल्यालाच मिळावे, अशीच धारणा बहुतांश आंदोलकांची दिसून येते. अनेक आंदोलनाचे स्वरूप केवळ फोटोपुरते आणि वृत्तपत्रांत बातमी येण्यापुरते मर्यादित राहिले आहे.
िपपरी पालिकेशी संबंधित विविध विषयांसाठी काही दिवसांपासून आंदोलनाचा सपाटा सुरू आहे. विविध संस्था, संघटनांनीही रान पेटवून सोडले आहे. ‘घरकुल’च्या लाभार्थ्यांना तातडीने घरे मिळावीत, यासाठी कष्टकरी संघटनेने पुन्हा आंदोलन केले. शिवणयंत्रांच्या वाटपासाठी होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ मोक्याच्या क्षणी मनसेने पालिका मुख्यालयात आंदोलन केले. चिखलीतील नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या ‘भोसरीकर’ नेत्यांनी आंदोलन केले. चिंचवडपुरते मर्यादित झालेल्या युवा मोर्चाकडून निवेदनांची मोहीमच सुरू आहे. केंद्रात व राज्यातील सत्ताधारी भाजपकडून ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक होत असल्याच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीने भाजपला िखडीत गाठण्याचे काम चालवले आहे. भाजपच्या विविध धोरणांच्या निषेधार्थ शहर काँग्रेसकडून सातत्याने निदर्शने व आंदोलनात्मक कार्यक्रम सुरू आहेत.
राष्ट्रवादी नगरसेवकांच्या परदेश दौऱ्यांवरून शिवसेनेने सभागृहात गोंधळ घातला, त्यानंतर, रस्त्यावर उतरून ‘भीक मांगो’ आंदोलन केले. राष्ट्रवादीने त्याच शैलीत प्रत्युत्तर देत शिवसेनेच्या आंदोलनाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. िपपरीतील भीमसृष्टी प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे म्हणून माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांनीही आंदोलन केले. राष्ट्रवादीचे कामगार नेते यशवंत भोसले यांची कामगारांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू आहेत. अनेक विषयांवरून शहर भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते लक्ष्मण जगताप यांना पुन्हा-पुन्हा लक्ष्य करण्याचे धोरण ठेवले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले. तर, खडसे यांच्या समर्थनार्थ पक्षातील खडसे समर्थक रस्त्यावर उतरले. स्थायी समितीच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भाजपच्या एका गटाकडून सातत्याने आंदोलनात्मक पावित्रा घेतला जात आहे. याच गटाकडून पक्षनेत्या मंगला कदम यांना ‘लक्ष्य’ करण्यात आले आहे. संभाजीनगर-शाहूनगर प्रभागासाठी खर्चाची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ होत असून केवळ याच प्रभागाला झुकते माप मिळत असल्याचा कांगावा करून कदम पर्यायाने राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरणनिर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. सीमा सावळे, सुलभा उबाळे यांच्यात निवेदनांची चढाओढ सुरूच आहे. भाजपचे युवा सरचिटणीस अमोल थोरात यांचे राष्ट्रवादीच्या विरोधातील निवेदनांचे बाण सुरूच आहेत. त्यांचा ‘बोलविता धनी’ दुसराच असल्याची पक्षातच शंका व्यक्त केली जात आहे. महापालिकेत ११ सप्टेंबर १९९७ मध्ये लगतची १४ गावे समाविष्ट करण्यात आली. २० वर्षांनंतरही या गावांमध्ये नागरी प्रश्न सुटू शकलेले नाहीत, या मुद्दय़ावरून या भागातील नगरसेवक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सतत आंदोलने आणि निवेदनांचा भडिमार सुरू आहे. या सगळ्या घडामोडींमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे आंदोलनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होईल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.

पिंपरी पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू आहे.

Story img Loader