पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा महामोर्चा यशस्वी झाल्यानंतर त्याचे श्रेय कोणी घ्यायचे, यावरून वादंग सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मयूर कलाटे यांनी हा मोर्चा सर्वपक्षीय असल्याचे सांगत महायुतीच्या नेत्यांचे श्रेय नाकारले आहे. दुसरीकडे, कलाटे यांचा ‘बोलवता’ धनी दुसराच असल्याची टीका करत शिवसेनेने कलाटे यांच्या दुतोंडीपणावर बोट ठेवले आहे.
अनधिकृत बांधकामावरून पिंपरीतील राजकारण पेटले असून याविषयीचा निर्णय होणार, अशी चिन्हे दिसू लागल्याने राजकीय पक्षात चढाओढ सुरू झाली आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महायुतीच्या पुढाकाराने मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत उच्चस्तरीय शिष्टमंडळाने हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. तेव्हा पावसाळ्यात कारवाई न करण्याचे आश्वासन देत या प्रश्नी नवा कायदा करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. मोर्चा यशस्वी झाल्याचे वातावरण झाले आणि श्रेयाची लढाई सुरू झाली. मंत्रालयावर काढलेला मोर्चा सर्वपक्षीय होता. त्यासाठी ‘घर बचाव कृती समिती’ स्थापन केली होती. आपल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. असे असताना आम्हीच आंदोलन यशस्वी केल्याचे भासवून विरोधी पक्षाचे नेते दिशाभूल करत आहेत. मात्र, त्यांचे ढोंग जनतेच्या लक्षात आले आहे. बांधकामाचा प्रश्न राष्ट्रवादीच सोडवणार असून पक्षाचे नेते त्याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत, असा युक्तिवाद राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांनी केला. त्यावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या संपत पवार, नीलेश बारणे, विमल जगताप, संगीता भोंडवे या चार नगरसेवकांनी याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात, मोर्चाला मिळालेला प्रतिसाद व मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पित्त उसळले आहे, अशी टीका करण्यात आली आहे. मयूर कलाटेंना पुढे करून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. ‘पायी मोर्चा’ त कलाटे यांचा सहभाग नव्हता. मोर्चात सहभागी होऊ नका, असे ते वाकडच्या जनतेला सांगत होते आणि मोर्चा यशस्वी होताच त्याचे श्रेय घ्यायला निघाले आहेत. त्यांचे पारंपरिक विरोधक राहुल कलाटे मुंबईपर्यंत आले होते. या आकसापोटी मयूर कलाटे यांनी मोर्चाविषयीची पूर्वीची भावना बदलली असावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

Story img Loader