पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात झाडांना पडलेला काँक्रिट, डांबर व पेव्हर ब्लॉक्सचा विळखा घातक ठरत असून, काही भागातील झाडे वाळून चालल्याचे किंवा वठत चालल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेषत: रस्त्याच्या कडेची बहुतांश झाडे अशा प्रकारे काँक्रिट-डांबराच्या अतिक्रमणात अडकली आहेत. या झाडांना अतिक्रमणापासून मुक्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
शहरात रस्ता किंवा पदपथ करताना तिथल्या झाडांपर्यंत काँक्रिट व डांबराचे अतिक्रमण झाले आहे. अगदी झाडांना खेटून ते फासले गेले आहे. पेव्हर ब्लॉकसुद्धा तसेच खोडांपर्यंत बसविण्यात आले आहेत. त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर व ती सुकण्यावर होत असल्याचा इशारा वनस्पतितज्ज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांच्यासह अनेक अभ्यासकांनी दिली आहे. हे प्रत्यक्षात घडत असल्याचे शहरात दिसून आले आहेत. याबाबत नेमकेपणाने सर्वेक्षण झाले नसले, तरी पुण्यात अशी शेकडो झाडे वठण्याच्या मार्गावर आहेत, असे पर्यावरण अभ्यासक नंदू कुलकर्णी यांनी सांगितले. ही प्रक्रिया हळूहळू होत असल्याने या गोष्टीचे परिणाम भविष्यात पाहायला मिळतील, त्यामुळे याबाबत सर्वेक्षण होण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही रस्त्याच्या कडेची अनेक झाडे अशा प्रकारे वठत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही अशी गणना झालेली नसली, तरी किमान अडीच ते तीन हजार झाडे दुर्दशेच्या मार्गावर असल्याचे तेथील पर्यावरण अभ्यासक व कार्यकर्ते विकास पाटील यांनी सांगितले. ‘‘लांबचे कशाला? चिंवडमधील के.एस.बी. पंप ते मोरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर याच कारणामुळे एका ओळीतील आठ-नऊ झाडे वाळली आहेत. विशेष म्हणजे याच्याजवळच पालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. हा महत्त्वाचा मुद्दा असूनही त्याची हाताळणी गांभीर्याने केली जात नाही. पिंपरी पालिकेच्या आवारात असलेली अनेक झाडेसुद्धा अशाच प्रकारे काँक्रिटच्या विळख्यात अडकलेली आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर या प्रश्नावर अधिकाऱ्यांना घेराव घालू’’ असा इशारा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.
तज्ज्ञ असे सांगतात?
‘‘झाडांना लागून काँक्रिट, डांबर लावल्यास त्यांच्या वाढीला अडथळा निर्माण होतो. जमिनीत पाणी मुरत नाही, मुळांना हवा मिळत नाही. त्याचा विपरीत परिणाम झाडांवर होतो. त्याच्यामुळे झाडे वठण्याचा आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे ती उन्मळून पडण्याचा धोका असतो.’’
नियम असे आहेत?
‘‘झाडे लावलेली असताना तिथे पदपथ किंवा तत्सम काही करायचे असेल, तर पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रिट झाडांपर्यंत फासू नये. झाडांच्या बुंध्याभोवती सर्व बाजूंनी किमान दीड फूट मोकळी जागा सोडावी, असा नियम आहे. महापालिकेनेही तसे परिपत्रक काढलेले आहे.’’
लोकसत्ता व्यासपीठ :
झाडे अशीच मरू द्यायची का?
झाडांचे महत्त्व सर्वाना माहीत आहे, ती सर्वाना हवीसुद्धा आहेत. मात्र, ती योग्य पद्धतीने राखली जात नाहीत. शहरात पूर्ण वाढ झालेली, सावली व प्राणवायू देणारी हजारो झाडे आहेत. मात्र, त्यांच्याभोवती काँक्रिट-डांबर फासल्याने ती वठण्याची भीती आहे. शहरात पावलो पावली हेच दिसते.. याबाबत शहराचा सुजाण नागरिक म्हणून आपले काय मत आहे? हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? या संदर्भात आपले मत सांगा. शिवाय आपल्या परिसरात अशी झाडे असतील, तर त्यांची माहिती आणि शक्य झाल्यास त्याचा फोटोसुद्धा
ई-मेलवर पाठवा.
आमचा पत्ता- लोकसत्ता, एक्स्प्रेस हाउस, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ५
ई-मेल- loksattapune@gmail.com

Story img Loader