महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांच्या निविदा प्रक्रियेची कामे सुरू झाली असून मेट्रो मार्गाच्या पहिल्या दहा किलोमीटर लांबीच्या कामाला एप्रिल महिन्यात सुरुवात होणार आहे. हे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले तर सन २०१९ पर्यंत मेट्रो प्रत्यक्षात धावणार आहे.
पुणे मेट्रोच्या कामाची महामेट्रो या कंपनीमार्फत अंमलबजावणी होणार आहे. या पाश्र्वभूमीवर मेट्रो मार्गिकेच्या कामांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया कंपनीकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
‘पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सपर्यंतचा मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामाची निविदा काढण्यात आली असून मार्च महिनाअखेरीस निविदा उघडल्या जातील. त्यानंतर एप्रिल महिनाअखेपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या मार्गासाठी किरकोळ स्वरूपात भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे काम सुरू करण्यास मोठा अडथळा नसेल,’ असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, की बीआरटी, पीएमपी, लोकल, रिक्षा, सायकल अशा वाहतुकीच्या विविध साधनांची सांगड मेट्रोशी घालण्याचे नियोजन आहे. या साधनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना मेट्रोच्या वापराकडे वळवाले लागणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि नागपूर मेट्रोसाठी मिळालेली मोकळी जागा यांचा विचार करता पुण्यात तुलनेने कमी जागा आहे. मात्र याही परिस्थितीमध्ये वेगाने प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मेट्रोच्या अंमलबाजवणीसाठी स्वतंत्र कंपनी असल्यामुळे आणि या कंपनीचे स्वत:चा कायदा असल्यामुळे प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास कोणताही अडथळा येणार नाही. वनाज ते रामवाडी आणि िपपरी ते स्वारगेट या दरम्याच्या कामासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गावर दोन टप्प्यात निविदा राबविण्यात येईल. वनाज ते रामवाडी मार्गाची पहिली निविदा तीस मार्च रोजी खुली करण्यात येईल. तर रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम एप्रिल महिन्याच्या अखेपर्यंत निविदा प्रक्रिया राबवून सुरू होईल.
‘ य मार्गावरील स्टेशन आणि अन्य सुविधांच्या कामांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. रेंजहिल्स ते स्वारगेट या दरम्यानच्या पाच किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठीचे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन बहुतांश ठिकाणी मेट्रोच्या खांबांचा आकार कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो मार्गाच्या पहिल्या दहा ते साडेदहा किलोमीटर लांबीच्या कामाला एप्रिल महिन्यात प्रारंभ होणार आहे. पिंपरी ते रेंजहिल्सचे काम एप्रिल महिन्यात तर त्यानंतर वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदाम मेट्रो मार्गाची निविदा एप्रिल महिन्यात सुरू होऊन त्यानंतर मे महिन्यापर्यंत हे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचे नियोजन आहे. शिवाजीनगर ते रामवाडीच्या निविदा त्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीनंतर काढण्यात येणार आहे.