एकाच खोलीत तीन इयत्तांचे वर्ग, विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने शाळा उद्यानात

पिंपरी नेहरुनगर येथील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत वर्ग खोल्या कमी पडत असल्यामुळे एकाच खोलीत तीन वर्ग एकत्र घ्यावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचीही मोठी गैरसोय होत आहे. इंद्रायणीनगर येथील शाळेसाठी आरक्षित असलेला भूखंड एका खासगी संस्थेच्या घशात घालण्यात आला आहे. त्यामुळे येथील महापालिकेची शाळा उद्यानामध्ये भरवावी लागत आहे. शालेय साहित्याच्या खरेदीमध्येच फक्त रस असणाऱ्या लोकप्रतिनिधींना शाळांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही आणि त्यांच्याकडून शाळांच्या सुधारणेसाठी विशेष काही प्रयत्नही होत नाहीत.

पिंपरी महापालिकेच्या शहरात १३१ शाळा आहेत. नेवाळे वस्ती येथील शाळेची इमारत सोडली तर बहुतांश शाळांची महापालिकेची स्वत:ची इमारत आहे. मात्र अनेक ठिकाणी काही ना काही उणिवा आहेत. वाल्हेकरवाडी येथील इमारत विद्यार्थ्यांसाठी कमी पडत आहे. एकाच खोलीत दोन वर्ग भरवावे लागतात. कुदळवाडीसारख्या भंगार व्यावसायिकांच्या गर्दीमधील महापालिकेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीची कौले फुटलेली आहेत.

बोऱ्हाडेवाडी येथील शाळेसाठी आरक्षित असलेली जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेसाठी इमारत बांधता येत नाही. जाधववाडी येथील शाळेची इमारत जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे वर्ग झाली आहे. या शाळेच्या इमारतीचे बांधकामही कालबाह्य़ झाले आहे. वाल्हेकरवाडी येथील शाळेची इमारत रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेहरुनगरमध्ये पहिली ते सहावीपर्यंत शाळा आहे. या वर्गासाठी इमारत कमी पडत असल्यामुळे एकाच खोलीत तीन वर्गातील विद्यार्थ्यांना बसवावे लागते. रहाटणी येथे महापालिकेच्या शाळेमध्ये दीड हजार पटसंख्या आहे. मात्र, इमारत कमी पडत आहे. दोन पाळ्यांमध्ये शाळा भरवूनही एकाच वर्गात दोन इयत्तामधील विद्यार्थी एकत्र बसवावे लागत आहेत. महापालिकेची भोसरी येथील इंग्रजी माध्यमाची शाळा, तसेच केशवनगर, निगडी आदी  शाळांच्या खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. बहुतांश शाळांमधील वायरिंगही खराब झाले आहे. लोंबकळणाऱ्या विजेच्या वायर अनेक ठिकाणी दिसतात.

 

Story img Loader