दोन महिन्यांत साडेचार लाख ग्राहकांकडून डाउनलोड

वीज ग्राहकांसाठी महावितरणने विकसित केलेल्या व ग्राहक सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या मोबाइल अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत असून, दोनच महिन्यांमध्ये साडेचार लाखांहून अधिक वीजग्राहकांनी हे मोबाइल अ‍ॅप घेतले आहे. सध्या गणेशोत्सवानिमित्त पुणे, पिंपरी- चिंचवड शहरात विविध माध्यमातून या अ‍ॅपचा जागर करण्यात येत असून, पुणे परिमंडलातील सर्वच वीजग्राहकांनी हा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात पोस्टर्स, स्टॉल्स, माहितीपत्रक, जिंगल्स, ध्वनिचित्रफीत, डिजिटल बोर्ड, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून मोबाइल अ‍ॅपचा जागर करण्यात येत आहे. वीजग्राहकांसाठी असलेल्या मोबाईल अ‍ॅपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडिट, डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्डसचा पर्याय आहे. त्यात बिल भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळणार आहे.

वीजसेवेबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्काची व तक्रारी करण्याची सोय आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना इतर सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्ययावत करण्याचीही सोय आहे. मीटर रिडींग न घेतलेल्या ग्राहकांना वीजबिल तयार करण्यापूर्वी ‘एसएमएस’द्वारे लिंक पाठविण्यात येणार असून संबंधित ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमधील अ‍ॅपद्वारे मीटर रिडींग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय होणार आहे. ज्या वाहिनीवरील वीजपुरवठा खंडित होईल तो पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे. हा मोबाइल अ‍ॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अ‍ॅन्ड्रॉईड’, ‘विन्डोज’ व ‘आयओएस’ ऑपरेटींग सिस्टीमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येईल. महावितरणच्या http://www.mahadiscom.in या  संकेतस्थळासह गुगल प्ले-स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय आहे.