राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान झपाटय़ाने खाली आल्याने राज्याला ‘हुडहुडी ’ भरली आहे. पुण्यातही तापमान दहा अंशाच्या खाली आल्याने चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान बीड येथे ९.४ आणि पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
मध्य प्रदेश आणि उत्तरेकडील काही राज्यांत थंडीची लाट आली आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंड वारे राज्याकडे वाहू लागल्यामुळे राज्यातील बहुतांश शहरातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या खाली आले आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातही किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंशानी खाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील तापमान झपाटय़ाने कमी होत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका चांगला जाणवू लागला आहे. सकाळ आणि संध्याकाळी शेकोटय़ा पेटल्याचे चित्र दिसत आहे. नागरिक बाहेर पडताना गरम कपडे घालूनच बाहेर पडताना दिसत आहेत. येत्या चोवीस तासांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
राज्यातील किमान तापमान पुढील प्रमाणे- पुणे ९.९, अहमदनगर १०.३, जळगाव १२.५, कोल्हापूर १७.४, महाबळेश्वर १३, मालेगाव १२, नाशिक ९.७, सांगली १८.२, सातारा १२.९, मुंबई २३.५, उस्मानाबाद १२.२, औरंगाबाद ११.६, परभणी ११.७, अकोला १२.५, अमरावती १२.८, चंद्रपूर १४.५, वर्धा १२.१, यवतमाळ १०.८ आणि नागपूर १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

Story img Loader