राज्याची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर सोमवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आणण्यात आले असले, तरी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा राबविण्याचा राज्यातील पहिला मान पुण्याला मिळाला आहे. शहरात चार महिन्यांपूर्वीच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहारावर १२५० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहे.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट घडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. विविध कारणांनी हा प्रकल्प रेंगाळला असला, तरी अखेर तो ऑगस्टमध्ये पूर्ण झाला. सध्या पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व प्रमुख ठिकाणे, चौक व रस्त्यांवर १२५० कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही संख्या पुढील काळात वाढविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत या कॅमेऱ्यांच्या नजरेखाली ६५० चौरस किलोमीटरचा परिसर आला आहे. व्यापक प्रमाणात सीसीटीव्ही बसविण्याची राज्यातील ही पहिलीच योजना ठरली.
पोलीस आयुक्तालयाच्या चारही झोनसह खडकी व पुणे कॅन्टोन्मेंटचा परिसरही या योजनेखाली आला आहे. शहरभर लावण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालयात असून, तेथे चोवीस तास कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यातून पोलिसांनी आजवर विविध गुन्ह्य़ांचा छडाही लावला आहे. या योजनेमध्ये पुढील काळात आणखी कॅमेऱ्यांची भर पडणार असून, खासगी सोसायटय़ा किंवा इतर यंत्रणांचे सीसीटीव्ही कॅमेरेही मुख्य यंत्रणेत जोडण्यात येणार आहेत.