पिंपरी-चिंचवडमधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून दोन अजगर चोरीला गेल्याची घटना घडली. संग्रहालयातून प्राणी गायब होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी संग्रहालयातून चार मगरी गायब झाल्याचे उघडकीस आले होते. या मगरींची चोरी झाली की, त्यांची विक्री करण्यात आली हे अस्पष्ट असताना अजगर चोरीच्या घटनेमुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री संग्रहालयातून दोन अजगरांची चोरी झाली. याप्रकरणी निगडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काचेची पेटी फोडून अजगरांची चोरी करण्यात आली, अशी तक्रार संग्रहालय प्रशासनाने दाखल केली आहे. बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे काही महिन्यांपूर्वी २० सापांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच संग्रहालयातून ८ मगरी गायब झाल्याने खळबळ माजली होती. मागील वर्षीच्या ऑक्टोंबरमध्ये संग्रहालयात १६ मगरी होत्या. २२ नोव्हेबरला ४ मगर गायब झाल्या. तर डिसेंबरमध्ये ४ मगरींचा मृत्यू झाला.