२० वर्षे सातत्य राखूनच जीवनमान उंचावेल : राजन यांची स्पष्टोक्ती
भारताची आर्थिक वाढ जगात जास्त असली तरी त्यामुळे अत्यानंदाने हुरळून जाण्याचे कारण नाही, अशी स्पष्टोक्ती रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी येथे केली. जगातील देशांच्या अर्थव्यवस्थांची स्थिती बघता भारत म्हणजे अंधांच्या नगरीत एकाक्ष राजा एवढेच म्हणता येईल, असे वास्तवदर्शी वक्तव्य अलीकडेच करणाऱ्या राजन यांनी पुन्हा एकदा तोच रोख कायम ठेवला आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे सांगून राजन यांचे म्हणणे धुडकावण्याची धडपड केली होती.
राजन यांनी एनआयबीएमच्या पदवीदान समारंभात कठोर वास्तवाचे भान देताना सांगितले की, भारताचे दरडोई उत्पन्न कमीच आहे त्यामुळे आनंदातिरेकाने वाहून जाण्यापूर्वी नागरिकांच्या चिंता जाणून घेतल्या पाहिजेत. आताचा विकास दर आणखी वीस वर्षे टिकवून ठेवता आला तरच प्रत्येक नागरिकासाठी सन्मान्य जीवनमान साध्य करता येईल.
चीनलाही आपण आर्थिक विकासात मागे टाकत आहोत, हा भ्रमाचा भोपळा फोडत ते म्हणाले की, सामान्य चिनी नागरिक आपल्या सामान्य भारतीयापेक्षा चार पट श्रीमंत आहे. १९६० मध्ये चीनची अर्थव्यवस्था ही भारतापेक्षा लहान होती पण आता ती भारताच्या पाचपट आहे व ब्रिक्स देशात सर्वात कमी दरडोई देशांतर्गत उत्पन्न भारताचे आहे.
देशाच्या मध्यवर्ती बँकेचा प्रमुख म्हणून भारत जरी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश असला तरी मी आनंदातिरेक दाखवू शकत नाही. या आनंदात मश्गुल राहिलो तर हा विकास दर टिकवण्यासाठी जे करायचे आहे ते आपण आत्मसंतुष्ट राहून थांबवू अशी भीती मला वाटते. त्यामुळे विकास दर वाढला अशी हाकाटी करीत फिरण्यापेक्षा तो टिकवण्याला महत्त्व दिले पाहिजे, असे खडे बोल त्यांनी सुनावले.
प्रदीर्घकाळ वाढता आर्थिक विकास दर राखण्यासाठी चांगल्या उपाययोजनांची अंमलबजावणी हाच एक उपाय असतो. केंद्र व राज्य सरकारे शाश्वत वाढीसाठी चांगले काम करीत आहेत पण फार मोठा काळ या मार्गावर निर्धाराने पावले टाकणे कठीण असते त्यामुळे साशंकता वाटते. भारताची क्षमता मोठी आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. उत्पादन क्षेत्रात आपण ७० टक्के क्षमता वापरलेलीच नाही व कृषी क्षेत्राला लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाचा सामना करावा लागला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अंधांच्या नगरीतील एकाक्ष राजा या शब्दप्रयोगाबाबत त्यांनी सांगितले की, डच तत्त्वज्ञ इरॅस्मस याने लॅटिन भाषेत प्रथम त्याचा वापर केला होता. आपली आर्थिक वाढ जास्त चमकदार दिसते आहे कारण इतर देशांची वाढ जोमदार नाही हे आपल्याला त्यातून सांगायचे होते.

दृष्टिहीनांची माफी!
अंधांची उपमा वापरल्याबाबत राजन यांनी बुधवारच्या कार्यक्रमात दृष्टिहीनांची जाहीर क्षमा मागितली. ही उपमा दिल्याने अहमदाबाद येथील द ब्लाइंड पीपल्स असोसिएशन या संस्थेने राजन यांना पत्र लिहून निषेध केला व माफीची मागणी केली होती.

Story img Loader