मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भक्कम पाठबळ असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचंड राजकीय दबावातून पिंपरी-चिंचवडचे पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची अखेर बदली करण्यात आली. त्यांना मुद्रांक शुल्क विभागाच्या महानिरीक्षकपदावर पाठवण्यात आले असून, त्यांच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची वर्णी लागली आहे. सर्वाना गाफील ठेवून झालेल्या या बदलीचे तीव्र पडसाद उमटणार असून, बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिक मोठय़ा संख्येने रस्त्यावर येतील, असे स्पष्ट संकेत आहेत.
परदेशी यांच्या संभाव्य बदलीचा विषय गेले महिनाभर चर्चेत होता. गेल्या काही दिवसांत अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांची बदली टळणार असे वाटत असतानाच शुक्रवारी सायंकाळी त्यांची बदली जाहीर झाली. आयुक्त दिवसभर बैठकीसाठी मुंबईत होते. त्यांना सायंकाळी बदलीचा आदेश कार्यालयात प्राप्त झाला.
परदेशी हे नांदेडचे जिल्हाधिकारी असताना अजितदादांनीच त्यांना िपपरीचे आयुक्त म्हणून आणले. मात्र, त्याच अजितदादांनी परदेशींची बदली करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. नियमावर बोट ठेवून काम करण्याची परदेशींची पारदर्शक कार्यपद्धती सत्तारूढ राष्ट्रवादीच्या दृष्टीने कमालीची अडचणीची ठरली होती. परदेशींनी सर्वच बाबतीत नियमाचा आग्रह धरला. त्यामुळे स्थानिक नेत्यांची, नगरसेवकांची दुकानदारी अडचणीत आली. पैशाची उधळपट्टी करणारे निर्णय त्यांनी बदलले, ठेकेदारांना चाप लावला. प्रशासकीय शिस्त बसवतानाच १२०० बदल्या केल्या. मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणले. जवळपास ५० जणांचे निलंबन केले.
परदेशी यांनी तब्बल ५५० अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्या. त्या वेळी कोणताही दबाव त्यांनी जुमानला नाही. या कारवाईवरूनच त्यांना धमकीची सात पत्रे आली होती. तरीही त्यांची धडक मोहीम सुरूच होती. आयुक्तांचे राष्ट्रवादीशी कमालीचे बिनसले होते. महापौर, आमदार, शहराध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांशी त्यांचे वारंवार खटके उडत होते. जकात रद्द झाल्याने ३५० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी मिळणार होते, त्यामुळे त्यांनी कपातीचे धोरण राबवणे सुरू केले, त्यावरून शहराचा विकास ठप्प झाल्याचा कांगावा सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. दुसरीकडे, ‘सारथी हेल्पलाइन’ सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. आयुक्तांविषयी सातत्याने तक्रारी होऊनही अजितदादा सुरुवातीला त्याकडे लक्ष देत नव्हते. मात्र, तक्रारींचे प्रमाण वाढू लागले. राष्ट्रवादीच्या मनाप्रमाणे ते काम करत नसल्याने आणि आगामी निवडणुकीत असा अधिकारी अडचणीचा ठरू शकत असल्याने आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला. त्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने मुख्यमंत्र्यांचाही नाइलाज झाला.
आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा सुरू झाल्यावर गेले महिनाभर विविध संस्था, संघटना तसेच सामान्य नागरिक रस्त्यावर आले. त्यात राजकीय पक्ष उतरल्याने राजकारणही सुरू झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे बदली रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, गेले दोन आठवडे काही हालचाल झाली नाही. त्यामुळे आयुक्तांची बदली रद्द झाली व ती आपल्यामुळेच झाली, असे दावे अनेकांनी केले. अशा गाफील वातावरणात शुक्रवारी आयुक्त मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत गेले होते. त्या वेळीच त्यांच्या बदलीचे आदेश पालिकेत आले.

Story img Loader