पिंपरी महापालिका नाटय़गृहांच्या वेगवेगळय़ा तऱ्हा
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात तारखांची खूपच ओरड आहे. कार्यक्रमांच्या वाढत्या संख्येमुळे चांगल्या नाटकांनाही तारखा मिळत नाहीत. तर भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहात नाटक कंपन्या फिरकत नाहीत. एकाच शहरात जेमतेम पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या दोन नाटय़गृहांमध्ये परस्परविरोधी चित्र दिसून येते. खर्च जास्त व उत्पन्न कमी, हा त्यांच्यातील समान धागा आहे.
शहरातील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या हेतूने महापालिकेने नाटय़गृहे सुरू केली. सद्य:स्थितीत, भोसरी, चिंचवडच्या नाटय़गृहांशिवाय पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर अशी तीन नाटय़गृहे शहरात आहेत. सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़गृह सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तर निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाटय़गृहाच्या उभारणीचे काम सुरू आहे. अत्रे रंगमंदिर असून नसल्यासारखे आहे. तिथे फारसे कार्यक्रमही होत नाहीत. त्यामुळे मोरे नाटय़गृह आणि लांडगे नाटय़गृह असे दोनच पर्याय आहेत. नाटकांपुरता विचार केल्यास चिंचवड नाटय़गृहाला सर्वाधिक मागणी आहे. कारण, नाटकांसाठी चांगला प्रेक्षक या ठिकाणी मिळतो. दोन आर्थिक वर्षांत अनुक्रमे १३२ आणि १४० नाटके चिंचवड नाटय़गृहात झाली आहेत. इतर कार्यक्रमांची संख्याही प्रत्येक वर्षी ५००च्या घरात आहेत. चिंचवड नाटय़गृहातील एखादी तारीख मिळवणे मोठे दिव्य आहे. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष व महापालिका यांच्या स्पर्धेतून उरलेल्या तारखा नाटक कंपन्यांच्या वाटणीला येतात. त्यातूनही अनेकांच्या भांडणात एखाद्याच्या पदरात ती तारीख पडते. त्यामुळे इतरांचा हिरमोड होतो. चांगल्या नाटकांनाही तारखा मिळत नाहीत, अशी तक्रार नेहमीच केली जाते. त्याकरिता पालिकेने मध्यंतरी शनिवार व रविवार हे दोन दिवस नाटकांसाठीच राखीव ठेवण्याचा तोडगा काढला होता, मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही.
या उलट परिस्थिती भोसरी नाटय़गृहात आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या लांडगे नाटय़गृहासाठी जवळपास २५ कोटी रुपये खर्च झाला होता. प्रारंभापासून ‘नाटक आणि लांडगे नाटय़गृह’ असा सूर कधी जुळलाच नाही. सहा वर्षांत भोसरीत जेमतेम २५ नाटकांचे प्रयोग झाले आहेत. स्थानिक पुढाऱ्यांच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमांमध्येच बहुतांश हे नाटय़प्रयोग झाले. नाटक कंपन्या या ठिकाणी नाटय़प्रयोग लावण्याचे धाडस करत नाहीत. नाटकांसाठी पोषक असे वातावरण येथे नाही, आवश्यक सोयीसुविधा मिळत नाहीत, प्रेक्षक येत नाहीत, असा सूर ते लावतात. नाटय़गृह व्यवस्थापनाकडून हे आरोप फेटाळून लावले जातात. संयुक्तपणे प्रयत्न केल्यास येथील परिस्थिती सुधारू शकते, असा विश्वास ते व्यक्त करतात.